तळा हायस्कूलच्या मैदानाची दुरवस्था

अतिक्रमणामुळे मुलांना खेळण्यास अडचण

| तळा | प्रतिनिधी |

तळा शहरात असलेल्या गो.म.वेदक हायस्कूल समोरील मैदानाची दुरवस्था झाली आहे. या मैदानावर विविध साहित्यांचे अतिक्रमण झाल्याने मुलांना खेळ खेळण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे स्थानिकांसह पालकवर्गातून नाराजीचे सुर उमटत आहेत.

गो.म. वेदक हायस्कूल समोरील मैदान हे तळा शहरातील मध्यवर्ती भागात असल्याने शालेय विद्यार्थ्यांसह येथील नागरिकांना क्रीडा व फेर फटक्यासाठी अत्यंत सोयीचे आहे. त्याचबरोबर विविध राजकीय, शैक्षणिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी या मैदानाला अधिक पसंती असते. तसेच, गो.म.वेदक विद्यालयासह रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेचे विद्यार्थी या मैदानाचा खेळासाठी उपयोग करीत असतात. परंतु, पावसाळ्यानंतर या मैदानाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. या मैदानासमोरच तळा शहराला पाणी पुरवठा करणारी टाकी बांधण्यात येत आहे. त्यामुळे त्या कामाचे सर्व साहित्य संबंधित ठेकेदाराकडून मैदानावर ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी लोखंडी साहित्यांचा व खडीचा समावेश आहे. त्यामुळे शाळेतील मुले त्या मैदानावर खेळत असताना त्यांना दुखापत होण्याची दाट शक्यता आहे. तसेच, तळा नगरपंचायतीच्या कचरा उचलणाऱ्या घंटा गाड्यांसह खासगी वाहने देखील दिवसरात्र याच ठिकाणी उभ्या केल्या जातात. परिणामी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान अपुरे पडत आहे. काही दिवसांतच शाळेतील विद्यार्थ्यांच्या हिवाळी मैदानी स्पर्धांना सुरुवात होणार आहे. मात्र, मैदानावर असलेल्या अतिक्रमणामुळे मुलांना विविध खेळ खेळताना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे तळा नगरपंचायत प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित मैदानावरील अतिक्रमण लवकरात लवकर हटवावे आणि मैदान मुलांना खेळण्यासाठी मोकळे करावे, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

Exit mobile version