वशेणी- दिघाटी रस्त्याची दुरवस्था

निकुष्ठ दर्जाच्या कामामुळे निधी वाया
उरण । वार्ताहर ।
उरण-पनवेल-पेण या तीन तालुक्यातील गावांना जोडणार्‍या वशेणी-दिघाटी रस्त्याच्या डागडुजीची कामे ठेकेदारांनी निकुष्ठ दर्जाची केली आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर झालेला 40 लाखांचा निधी वाया गेला आहे. तरी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या कडून वाया जाणारा निधी वसूल करावा जेणेकरून पुढील भष्ट कारभाराला लगाम बसेल अशी मागणी प्रवाशी नागरीक करत आहेत.

प्रवासी वाहनांचा, प्रवाशी नागरीकांचा प्रवास सुखकर होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यावर शासन लाखो, करोडो रुपयांचा निधी खर्च करत आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता, अभियंता आणि ठेका घेणारे ठेकेदार हे मंत्री महोदयांच्या व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन मंजूर झालेला निधी लाटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे जनतेला पुन्हा त्याच खड्डे युक्त रस्त्यातून धक्के खात आपला प्रवास करावा लागत आहे. उरण – पनवेल आणि पेण तालुक्यातील गावांना जोडणार्‍या वशेणी-दिघाटी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी शासनाकडून 2021-22 या वर्षासाठी सुमारे 35 लाखांचा निधी मंजूर झाला होता.

परंतु संबंधित ठेकेदाराने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या कुपा आशिर्वादाने रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हे अत्यंत निकुष्ठ दर्जाचे केले.त्यामुळे प्रवाशी नागरीकांच्या रहदारीचा असलेल्या रस़्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. अशा रस़्त्यातून मार्गक्रमण करणार्‍या मोटारसायकल स्वार, वाहनांना अपघातास सामोरे जावे लागत आहे. तरी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा भ्रष्ट कारभाराला लगाम घालण्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांच्या कडून वसूल करावा जेणेकरून पुढील रस़्त्याची कामे ही उत्तम दर्जाची होती अशी मागणी प्रवाशी नागरीक करत आहेत.

Exit mobile version