संघर्ष समितिचे तहसिलदारांना निवेदन
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
वाकण-खोपोली राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत असून, नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या महामार्गाच्या वळणांवर आणि दुतर्फा साईड पट्टीवर उंच गवत वाढल्यामुळे समोरून येणारी वाहने दिसत नाहीत, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाकण-खोपोली महामार्गावर वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सुधागड शेतकरी समन्वय संघर्ष समिती रायगड तर्फे संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. या संदर्भात समितीने पाली-सुधागडच्या तहसीलदारांना लेखी निवेदन दिले आहे.
समितीचे कार्याध्यक्ष सचिन तेलंगे आणि सचिव गिरीष काटकर यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महामार्गाच्या दुतर्फा साईड पट्टीवर उंच गवत वाढल्यामुळे रस्त्याच्या वळणांवरून समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. त्यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, रस्त्याच्या दुतर्फा व अनेक ठिकाणी खडी आणि माती साचल्याने वाहने घसरून अपघात होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे. पावसामुळे रस्त्यावर पाणी साचते, मात्र त्याच्या निचऱ्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. लेक सिटी ते रासळ यादरम्यान शाळा, उद्योग आणि व्यवसायिक केंद्रे असल्याने नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मात्र, रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. त्यामुळे या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसविण्यात यावेत, तसेच महामार्गावरील मोठमोठे खड्डे तातडीने दुरुस्त करण्यात यावेत. या समस्यांबाबत सुधागड शेतकरी समन्वय संघर्ष समितीच्यावतीने पालीच्या तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी कार्याध्यक्ष सचिन तेलंगे, सचिव गिरीष काटकर, मिलिंद खंकाळ, कैलास दळवी, पांडुरंग तेलंगे, नितीन जाधव आणि दिपक वालगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.







