| पाली | प्रतिनिधी |
सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या कुशीत असणाऱ्या सुधागड तालुक्यातील कळंब गावाच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात फार्महाऊस तसेच सेकंड होम आहेत. त्यामध्ये सुरु असलेल्या अनधिकृत गोष्टींच्या विरोधात कळंब ग्रामस्थांनी गुरूवारी (दि.9) पाली पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. त्याबाबतचे तक्रारी निवेदन पालीचे उपनिरीक्षक निकम यांना देण्यात आले आहे.
ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारी निवेदनात नमूद केले आहे की, गावच्या हद्दीत असणारे फार्म हाऊस व रिसॉर्ट येथे मुंबई, ठाणे, पुणे येथील युवा वर्ग तसेच उच्चभ्रू लोक सुट्टीच्या दिवशी मौजमजा करण्यासाठी येथे येत असतात. त्यावेळी ते मद्यधुंद अर्धनग्न अवस्थेत फिरत असतात तसेच कानठळ्या बसविणाऱ्या आवाजात धांगडधिंगा करत असतात. त्याचा नाहक त्रास येथील नागरिकांना सहन करावा लागत आहे. तसेच, येथे मद्यप्राशन केलेल्या बाटल्या, ओला-सुका कचरा आजूबाजूला किंवा नदीपात्रात फेकून दिल्याने परिसर दूषित होऊन पर्यावरणावर याचा गंभीर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या अनधिकृत कृत्यांचा गावातील युवा पिढीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने गावकरी चिंतेत पडले आहेत. या सर्व बाबींची पाली पोलिसांकडून तात्काळ दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पालीच्या पोलीस निरीक्षक हेमलता शेरेकर यांनी ग्रामस्थांच्या या तक्रारी अर्जाची दखल घेऊन संबंधितावर काय कारवाई करतात, याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे. यावेळी ग्रामस्थ समीर जाधव, नरेश खाणेकर, पांडुरंग आखाडे, धोंडू झोरे, गणेश जाधव, महेश मोरे, मोहन शिर्के, बंडू गोंडे, संजय तांबे, संदीप ठाकूर आदींसह गावातील नागरिक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.







