| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल परिसरातील नवनाथ नगर, खांदा वसाहत, तळोजा रोड, आणि आजूबाजूच्या भागात बुधवारी (दि.8) मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक अक्षरशः अंधारात बुडाले होते. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली असता कार्यालयात शुकशुकाट असून, उपस्थित कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने नागरिकांचा संताप अधिकच वाढला आणि नागरिकांनी रास्तारोको केले.
पनवेल परिसरातील आजूबाजूच्या भागांत बुधवारी मध्यरात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला होता. अचानक वीज गेल्याने शाळकरी विद्यार्थी, चाकरमानी, दुकानदार आणि गृहिणींचे प्रचंड हाल झाले होते. विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असताना वीज नसल्याने अभ्यासात अडथळा निर्माण झाला होतो. पाण्याचा पुरवठाही बंद असल्याने नागरिकांना मूलभूत गरजांसाठी त्रास सहन करावा लागला. काही भागांत शेजाऱ्यांकडे मोबाईल चार्ज करण्यासाठी रांगा लागल्या तर काही ठिकाणी फ्रीज आणि पंखे बंद असल्याने उष्णतेत नागरिकांना त्रास झाला. संतप्त नागरिकांनी महावितरण कार्यालयात धाव घेतली असता कार्यालयात शुकशुकाट होता. उपस्थित कर्मचाऱ्यांना, सगळीकडे लाईट आली, परंतु आमच्या भागात का नाही? असा सवाल नागरिकांनी विचारला. परंतु, त्यांच्याकडून उडवा उडवीची उत्तरे देण्यात आली. वीज वितरण विभागाचा 72 तासांचा संप सुरू असून, या संपामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले गेले. संपादरम्यान कोणताही अधिकारी वर्ग नागरिकांशी संवाद साधण्यास पुढे न आल्याने रोष अधिकच वाढला. नियमितपणे वीजबिल भरूनदेखील नागरिकांना असा त्रास सहन करावा लागत आहे, ही खेदजनक बाब असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
दरम्यान, संतप्त नागरिकांनी नवनाथ नगर परिसरात रस्त्यावर उतरून रस्तारोको केला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यांनी नागरिकांशी शांततेने संवाद साधून अडकलेली वाहने मार्गस्थ केली. तसेच, अशी वेळ पुन्हा आली तर आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा नागरिकांनी दिला आहे.







