पेण उपजिल्हा रुग्णांलयाचा भोंगळ कारभार

| पेण | वार्ताहर |

सर्व सामान्य जनतेला आज न परवडणारा खर्च म्हणजे वैद्यकीय खर्च आहे. त्यामुळे सर्व सामान्य नागरिक हे सरकारी रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी जात असतात. मात्र त्या रुग्णालयामध्ये देखील अनेकवेळा सर्वसामान्य जनतेला वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. सर्वात महत्वाची समस्या म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये कर्मचारी आपल्या जबाबदार्‍या योग्यप्रकारे पार पाडत नसल्याने रुग्णांना त्रास होत आहे. याबाबत नागरिकांनी कृषीवलशी संपर्क साधून आपली कैफियत मांडल्याने कृषीवलचे प्रतिनिधी शनिवारी (दि.6) सकाळी 8ः45 वाजता उपजिल्हा रुग्णालय पेण येथे पोहोचले. नियमानुसार 9 वाजता कामकाजाला सुरूवात होणे गरजेचे होते. केस पेपरची खोली वगळता सर्व खोल्यांना कुलुप लावलेले पहायला मिळाले. शेवटी 9ः15 च्या सुमारास कृषिवलच्या प्रतिनिधींनी जिल्हा शल्यचिकित्ससक डॉ. अंबादास देवमाने यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून सर्व घटना सांगितली. त्यावेळी डॉ. देवमाने यांनी येत्या आठवडयात सर्व कर्मचार्‍यांना एकत्र बोलावून बैठकीचे आयोजन करून ज्यांच्याविरुध्द तक्रारी आहेत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन दिले.

पेण उपजिल्हा रूग्णालयात 9 वाजून 20 मिनिटांनंतर प्रयोगशाळा उघडण्यात आली. त्यावेळी प्रयोगशाळचे पर्यवेक्षक श्रीराम म्हात्रे हे हजर नव्हते. त्याचे सहाय्यक वैभव शिंदे हजर होते. त्यांना विचारणा केली असता त्यांनी श्रीराम म्हात्रे रजेवर असल्याचे सांगितले. परंतु कार्यालयात पांडूरंग गाडे यांच्याकडे चौकशी केली असता श्रीराम म्हात्रे यांचा रजेचा अर्ज नसल्याचे उघड झाले. श्रीराम म्हात्रे यांच्याबाबत अनेक वेळा तक्रारी होऊन देखील ते आपली जबाबदारी योग्य पार पाडत नसल्याचे समोर आले. दंत चिकित्सक डॉ. अमोल नगराळे हे देखील कधीच वेळेवर येत नाहीत आणि वेळेच्या अगोदरच निघून जातात. या अगोदरही डॉ.नगराळे यांना दवाखान्यात हजर राहत नाहीत म्हणून तंबी देण्यात आली होती. क्ष-किरण कक्ष देखील 9 वाजता उघडणे गरजेचे होते. परंतु 9ः30 नंतर क्ष-किरण कक्ष उघडण्यात आले. क्ष-किरण तज्ञाने वाहतूक कोंडी झाल्याचे कारण सांगितले. सकाळी 8 वाजल्यापासून ग्रामीण भागातील रुग्ण रक्त तपासणी, थुंकी तपासणी, लघवी तपासणी, तसेच क्ष-किरण काढण्यासाठी येत असतात त्यांना ताटकळत बसावे लागते. मधुमेह रुग्ण तर उपाशी पोटी येत असतात. परंतु, वेळेवर रक्ततपासणी न झाल्याने त्यांना त्रासाला सामोरे जावे लागते. तसेच औषध वाटपाची खोली देखील 9ः15 नंतर उघडण्यात आली.

परंतु, तेथे असलेला कर्मचारी वैभव शिंदे याने आपण 8ः45 पासून हजर असल्याचे सांगितले. मात्र आमच्या प्रतिनिधींनी 9 वाजल्यापासून त्या खोलीचे फोटो काढल्यामुळे ते खोटे बोलत असल्याचे सिध्द झाले. स्वच्छतेच्या बाबतीत तर दवाखान्याला वार्‍यावरच सोडले आहे. उपजिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छतेचा ठेका न्यू ज्वाला सिक्यूरिटी पोस्ट नागपूर यांच्याकडे असून दोनमजली पूर्ण दवाखाना आणि बाहेरचा परिसर स्वच्छ करण्यासाठी फक्त तीन कर्मचारी असून त्या तीन कर्मचार्‍यामध्ये स्वच्छतेचे पूर्ण काम होत नसल्याची कबूली प्रकाश सोलंकी स्वच्छता कर्मचारी यांनी आमच्या प्रतिनिधींना दिली. नियमानुसार 6 कर्मचारी असणे गरजेचे आहे. परंतु ठेकेदार तीनच कर्मचारी देत असल्याने स्वच्छता गृहामध्ये उभे राहणे देखील कठीण झाले आहे. एकंदरीत सरकारी रुग्णालयात 90 टक्के कर्मचार्‍यांचा भरणा असताना देखील सहाय्यक अधिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत असल्याचे चित्र आहे.

Exit mobile version