उन्हाची चाहूल लागताच माठांची मागणी वाढली
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
उन्हाची चाहूल लागताच गरीबांचा ‘फ्रीज’ म्हणून ओळखला जाणारा माठ पुन्हा बाजारात दिसू लागला असून, त्याची मागणी वाढू लागली आहे. उन्हाळा सुरू होताच अनेक नागरिक माठ खरेदी करताना दिसत आहेत. माठातील पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते आणि ते आरोग्यासाठीही लाभदायक मानले जाते. त्यामुळे आजही अनेक घरांमध्ये उन्हाळ्यात माठाचा वापर केला जातो. होळीनंतर तापमानात वाढ होत असून, उन्हाची दाहकता वाढू लागली आहे. त्यामुळे माठाचे महत्त्व कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात सर्वसामान्यांची तहान भागविण्यासाठी माठाचा वापर पाणपोई, हॉटेल तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी केला जातो. तालुक्यातही उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने माठांची मागणी वाढू लागली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला उन्हाचा तडाखा सौम्य होता; मात्र होळीनंतर तापमानात वाढ होत असून, यंदाचा उन्हाळा तीव्र असण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी अनेकजण थंड पेयांकडे वळतात; मात्र फ्रीजमधील पाणी काहींना त्रासदायक ठरते. त्यामुळे अनेक नागरिक माठ खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यामुळे कुंभार समाजालाही रोजगार मिळतो. दरवर्षी उन्हाळ्यात माठाला मोठी मागणी असते. श्रीमंतांपासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनाच माठातील थंडगार आणि गोडसर चवीचे पाणी आवडते. त्यामुळेच माठाला ‘गरीबांचा फ्रीज’ असे संबोधले जाते.
