वालाच्या शेंगा खरेदीसाठी गर्दी; शेतावर निसर्गाच्या सानिध्यात मेजवानी
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण परिसरात मागील आठवड्यापासून शेतात तसेच फार्म हाऊसमध्ये पोपट्या पार्ट्या रंगण्यास सुरुवात झाली आहे. चिरनेर परिसरात आता गावठी वाल व चवळीच्या शेंगा तयार होण्याची सुरुवात झाल्यामुळे पोपटीची लज्जत वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर चिरनेरच्या बाजारात वाल-चवळीच्या शेंगा खरेदी करण्यासाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी दिसून येते. ग्राहक आनंदाने या शेंगांची खरेदी करून, पोपटी पार्टीतून गावठी वालाच्या शेंगाची विशिष्ट प्रकारची चव चाखत आहेत.
वालाच्या शेंगा तयार झाल्या की, खवय्यांना चाहूल लागते ती पोपटी पार्टीची. त्यामुळे सवंगड्यांशिवाय कौटुंबिक नात्यांसह मित्र-मैत्रिणींबरोबर पोपटी पार्टीचे बेत आखले जाऊ लागले आहेत. उरण तालुक्यात सध्या वाल-चवळीच्या शेंगाचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे काही दिवसांपासून गावठी वालाच्या व चवळीच्या शेंगा बाजारात येऊ लागल्याने ग्राहक वाल व चवळीच्या शेंगा घेण्यास आतुर झाले आहेत. वाल व चवळीच्या पिकासाठी थंडीचा हंगाम खूप उपयुक्त आहे. हे पीक दवावर तयार होते. जेवढी जास्त थंडी तेवढे पीक मोठ्या प्रमाणावर भरघोस येते. हे पिके तयार होण्यासाठी चार महिन्याचा कालावधी लागतो. या पिकासाठी जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. परंतु, या पिकाचा सुगंध वन्य प्राण्यांना आकर्षित करतो. वालाची झुडपे ही जंगली वानरे आणि रानटी उनाड गुरे यांचे आवडते खाद्य असल्यामुळे या प्राण्यांमुळे उरण तालुक्यातील रब्बी पिके धोक्यात आली आहेत. सध्या चिरनेरच्या बाजारात चवळी व वालाच्या शेंगांचा एक किलोचा दर 150 रुपये आहे. तरीही वाल-चवळीच्या शेंगांना प्रचंड मागणी असल्याचे रवींद्र भगत यांनी सांगितले.
पोपटी तयार करण्यासाठी येथील मोकळ्या जागी पोपटीचे मडके किंवा पत्र्याचा डबा बसविण्यासाठी थोडासा खड्डा खणला जातो. त्या खड्ड्यात मडके उलटे ठेवले जाते. त्यानंतर मडक्याभोवती पाला, पेंढा, सुक्या काटक्या टाकून, त्याला आग लावली जाते. साधारण अर्धा ते पाऊण तास हे मिश्रण शिजवले जाते. अर्धा ते पाऊण तासाने पोपटी करणारे जाणकार मडक्यावर थोडे पाणी शिंपडतात. चर्र असा आवाज आला की पोपटी शिजल्याचे समजते. पोपटीचा गरमागरम वाफाळता आस्वाद घेण्यासाठी सारे बैठक मारून सभोवार बसतात. मधोमध एका पेपरवर हे मडके ठेवून त्यातील वरचा भांबुर्डीचा पाला काढला जातो. मडक्यातील खमंग भाज्या, मुळ्या तर मांसाहारी असल्यास मटन, चिकन, अंडी बाहेर काढण्यासाठी सगळेजण तुटून पडतात. निसर्गाच्या सानिध्यात शेतावर ही पोपटी पार्टी केली जाते. त्यामुळे पोपटी पार्टीचा अनुभव अवर्णीय असतो. हे चित्र आता ग्रामीण भागात दिसू लागले आहे.







