राजकारणात महिलांचे स्थान मजबूत व्हावे- अ‍ॅड. मानसी म्हात्रे

| पंढरपूर | प्रतिनिधी |

राजकारणामध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात महिला मतदारांचा ओढा वाढत आहे. महिलांचे राजकारणातील स्थान अधिक मजबूत झाले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना 40 टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.

सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर आहे. रायगड जिल्ह्यातील उरण येथील यशश्री शिंदे या तरुणीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. नवी मुंबई येथील अक्षता म्हात्रे या महिलेवर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आले. या घटनेनंतर महिला सुरक्षित का नाही, असा प्रश्‍न कायमच निर्माण होत आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी शेतकरी कामगार पक्षाने शहरी भागासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी लाल ब्रिगेड संघटना निर्माण केली पाहिजे. यासाठी पक्षाने बळ व प्रेरणा दिली पाहिजे. मुलींसाठी दहावीपर्यंत मोफत शिक्षण मिळाले पाहिजे. कंत्राटी स्वच्छता महिला कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेतले पाहिजे. ही मागणी करत सरकारच्या ही बाब निदर्शनास आणून देणे काळाची गरज आहे, असे अलिबाग नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी मात्रे यांनी सांगितले.

Exit mobile version