चांगल्या निर्णयाची अपेक्षा- प्रकाश आंबेडकर
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रिलायन्स प्रकल्पग्रस्त आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेली बैठक सकारात्मक झाली असल्याची माहिती अॅड प्रकाश आंबेडकर यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी व्यवस्थापनांशी बोलून 15 दिवसांच्या आतमध्ये प्रपोजल मागितले आहे. रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना कशा रितीने न्याय देता येईल यासंदर्भातला आहे. 15 दिवसांनी पुन्हा बैठक बोलवली जाईल. चांगला निर्णय होईल अशी अपेक्षा देखील अॅड आंबेडकर यांनी व्यक्त केली.
वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष अॅड प्रकाश आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमीपुत्र व प्रकल्पग्रस्तांच्या एल्गार संदर्भात आज अॅड प्रकाश आंबेडकर यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी तसेच रिलायन्स कंपनीचे प्रशासन उपस्थित होते.
रिलायन्स प्रकल्पग्रस्त आणि जिल्हाधिकारी यांच्यात झालेल्या या बैठकीत बराचवेळ चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सकारात्मक भुमीका घेतली. मागिल इतिवृत्तानुसार रिलायन्स प्रशासनाने देखील 206 प्रकल्पग्रस्तांना कामावर घेण्याचे मान्य केले. याबाबत 15 दिवसांत रिलायन्स व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्त आणि जिल्हाधिकारी यांना प्रपोजल तयार करुन त्याप्रमाणे नियोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भात 15 दिवसांनी पुन्हा बैठक बोलवली जाणार असून तोपर्यंत जर सकारात्मक निर्णय घेतला गेला नाही तर मात्र प्रकल्पग्रस्त आपले आंदोलन आणखी उग्र करतील असा इशारा आंदोलकांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी पत्रकारांसोबत बोलताना अॅड प्रकाश आंबेडकर यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या धरपकडीबाबत अॅड आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त करुन आंदोलन होताना पोलिसांची ही भुमीका चुकीची असल्याचे सांगून त्यांनी लोकांशी व्यवस्थीत वागावे असे मत व्यक्त केले. तसेच आपण यासंदर्भात पोलिस अधिक्षकांशी बोललो असून यावेळी त्यांनी झालेल्या चुका दुरुस्त करु असे त्यांनी सांगितले.