वीज प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम
| नेरळ | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील दुर्गम भागात असलेली इर्शाळवाडी एका क्षणात जमिनीमध्ये गाडली गेली आणि अनेकांचे जीव गेले. अशीच घटना कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडा येथे टाटा कंपनीच्या कारभारामुळे घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याठिकाणी टाटा कंपनीकडून जलविद्युत प्रकल्पासाठी 65 एकर जमिनीमध्ये खोदकाम करून पाणी साठवण धरण बांधले जात आहे. दरम्यान, या पाणी साठवण धरणासाठी करण्यात आलेल्या खोदकामाच्या मातीचे डोंगर उभे राहिले आहेत. ते डोंगर काही दुदैवी घटनेमुळे तापकीरवाडी धनगरवाडा येथील 22 घरांवर कोसळले तर येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कर्जत तालुक्यातील भिवपुरी गावातील टाटा कंपनीच्या मोकळ्या जमिनीवर टाटा पॉवरकडून वीज निर्मिती प्रकल्प उभा राहणार आहे. या ठिकाणच्या जमिनीमध्ये 100 मीटर खोदकाम करून पाणी साठवण करणाऱ्या मोठ्या तलावाची निर्मिती केली जात आहे. टाटा कंपनीकडून येथे वीजेची साठवण करण्यासाठी उदांचन 1000 मेगाव्हॅट प्रोजेक्टच्या कामाला 2025 मध्ये सुरुवात झाली होती. गतवर्षी मे महिन्यापासून प्रचंड प्रमाणात खोदकाम करून 65 एकर जमिनीमध्ये खोल खड्डा खोदला जात आहे. त्यामुळे परिसरातील पर्यावरण धोक्यात आले आहे. या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी अवजड मशिन आणण्यात आल्या असून त्या दिवसरात्र कार्यरत असतात. प्रसंगी सुरुंग स्फोट देखील केले जातात. त्यावेळी निघणारी माती एका बाजूला साठवून ठेवली जात आहे. त्यात एका बाजूला दगड आणि दुसऱ्या बाजूला मातीचे असे इमारती एवढ्या उंचीचे ढीग रचले गेले आहेत. त्यामुळे हे मातीचे ढीग येथील आदिवासी वाड्यांसाठी जीवघेणे ठरू शकतात. पावसाळ्यात हे मातीचे ढीग प्रसंगी तापकीरवाडी येथील धनगरवाडा यांना जमिनीत गाडू शकतात. त्यामुळे तापकीरवाडी येथील धनगरवाड्याची इर्शाळवाडी होण्याची भीती स्थानिकांमध्ये आहे.
