अनेक ठिकाणी पथदिवे, गतिरोधकाचा अभाव
| पाताळगंगा | प्रतिनिधी |
सावरोली-खारपाडा हा रस्ता उत्तम दर्जाचा झाला असला तरी सुद्धा अनेक समस्यांच्या विळख्यात हा रस्ता गुंतलेला दिसत आहे. या मार्गावर येत असलेल्या गावांच्या ठिकाणी गतिरोधकाचा आभाव दिसून येत असून तुरळक ठिकाणी हे बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर साईटपट्टी आणि वळणांवर रात्रीच्या वेळी अंधार यामुळे या मार्गावरून रात्रीचे प्रवास अनेकांच्या जीवावर बेतत आहे. तीन दिवसापूर्वी माजगाव येथील पांडुरंग ढवाळकर रात्रपाळीच्या कामाला जात असताना अपघात होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना या परिसरातील या ग्रामस्थांसाठी हळहळ व्यक्त करणारी आहे.
या मार्गावर औद्योगिक कारणांचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून वाहनाची रहदार वाढली आहे. त्याचबरोबर नियोजित वेळेवर पोहचण्यासाठी वाहन अतिवेगाने चालवित असतात. परिणामी या मार्गांवर प्रवास करणाऱ्या व्यक्ती जीवावर बेतत आहे. त्याचबरोबर सीसीटीव्हीचा आभाव, वळणावर वाढलेले गवत झाडे, तसेच आदी लक्षणे अपघाला कारणीभूत ठरत आहे. तसेच वळणावर मोठ्या प्रमाणात अंधार असल्यामुळे पायी चालत असलेल्या व्यक्तीचा अपघात घडत असल्याचे निदर्शनास येत आहे. याठिकाणी अनेक अपघात घडले असून याकडे मात्र सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. परिणामी हा रस्ता अपघाताचे केंद्रबिंदू ठरत आहे.
विशेष म्हणजे ज्या ठिकाणी अंधार असेल त्या ठिकाणी सौर उर्जेचे दिवे लावले तर अपघातात कोठेतरी अंकुश राहील. मात्र याकडे संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्यामुळे अपघाताची मालिका सातत्याने या ठिकाणी सुरू असल्याचे पहावयास मिळत आहे. वाहनातून पडत असलेली माती किंवा बारीक खडी, केमिकल ऑईल गळती असे प्रकार या ठिकाणी सातत्याने घडत आहे. यामुळे अपघाताची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
सावरोली खारपाडा या रस्त्याच्या संदर्भात तक्रारीचे निवारण करण्यात येईल तसेच या ठिकाणी साईट पट्टी, त्याच बरोबर झाडे किंवा झुडपे वाढलेले गवत काढण्यात येईल,ज्या ठिकाणी गतीरोधक नाही तो प्रस्ताव पुढे पाठवून योग्य तो निर्णय घेतला जाईल.
– आकाश केंजळे, खालापूर अभियंता साबावि
या मार्गावरून औद्योगिक वाहने, कर्मचारी बस यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वळणावरील अंधार, झाडे-झुडपे गतिरोधकाचा, सीसीटीव्ही कॅमेरा, पथदिवे यांचा अभाव यामुळे गेल्या अनेक वर्षात अनेक अपघात घडले आहे. संबंधित अधिकारी याकडे पाहणी करून मार्गे काढण्यात यावे.
– जयवंत पाटील, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती- खालापूर







