साहेब लक्ष द्या! जीव मुठीत घेऊन करतोय मासेमारी

महावितरणचा गलथानपणा उघड

। अलिबाग । शहर प्रतिनिधी ।

अलिबाग तालुक्यातील आक्षी-रायवाडी येथे महावितरणच्या गलथान कारभारामुळे कोळी बांधवांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. येथील खाडीमध्ये असलेला विजेचा खांब जीर्ण झाला असून, पूर्णपणे वाकला आहे. त्यामुळे या खांबावरील तारा पाण्यामध्ये लोंबकळत आहेत. तारांमधील विद्युत प्रवाह सुरु असल्याने कोळी बांधवांना आपला जीव मुठीत धरून मासेमारी करावी लागत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करुनही अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्यामुळे हतबल झालेल्या कोळी बांधवांनी शेकाप नेत्यांच्या सहकार्याने महावितरण विभागाला निवेदन दिले. यावेळी कोळी बांधवांनी ‘साहेब लक्ष द्या, जीव मुठीत घेऊन मासेमारी करावी लागतेय’, असे सांगत ही बाब गांभीर्याने बघण्याची विनंती केली.

रायवाडी येथील कोळी बांधव प्रामुख्याने भरतीच्यावेळी आपल्या होड्या घेऊन मासेमारीस जात असतात. खाडीत असलेला विजेचा खांब जीर्ण झाला असून, तो खाडीकडील बाजूकडे वाकला गेला आहे. त्यावर असणार्‍या विजेच्या तारा भरतीच्यावेळी पूर्णपणे पाण्यात पूर्णपणे बुडल्या जातात. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या विजेच्या तारांना धक्का लागल्यास जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जीर्ण झालेला विजेचा खांब बदलून नवीन खांब टाकण्यासाठी वेळोवेळी नागाव येथील महावितरणच्या अधिकारी व कर्मचार्‍यांकडे तक्रार देऊनसुद्धा जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप येथील कोळी बांधवांकडून केला असून, याबाबत संताप व्यक्त केला.

दरम्यान, बुधवारी (दि.10) आक्षी गावचे शेकाप युवा नेते अभिजित वाळंज, ग्रामपंचायत सदस्या रश्मी वाळंज, संतोष राऊळ, मंगेश बानकर यांच्यासह कोळी बांधवांनी अलिबाग येथील महावितरण कार्यालयात जाऊन इनामदार यांना याबाबत निवेदन देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे सांगितले.

भरतीच्या वेळी मच्छिमारीसाठी निघालो असता जीर्ण झालेल्या खांबावरच्या विजेच्या तारा पूर्णपणे पाण्यात बुडाल्या असल्याने पटकन दिसण्यात आल्या नाही. तारांच्या जवळ जाताच प्रसंगावधान राखून तात्काळ होडीचा मार्ग बदलला. त्यामुळे मी स्वतःचा जीव वाचवू शकलो.

मंगेश बानकर, मच्छिमार, रायवाडी


काही दिवसांपूर्वी संबंधित अधिकार्‍यांशी या विषयावर चर्चा झाली असून, लवकरात लवकर जीर्ण झालेला विजेचा खांब काढून नवीन खांब बसवण्यात येईल.

श्री. इनामदार, मुख्य अभियंता, महावितरण
Exit mobile version