‘ते’ आत्मदहन आंदोलन स्थगित

अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील प्रांत कार्यालयात संविधान दिनाचा पूर्व संध्येला सरकारी टेबलावर दारूपार्टी करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना सरकारी सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश पाटील यांनी पुकारलेले आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव यांच्या सोबत झालेल्या बैठकीत विभागीय चौकशीनंतर सर्वांवर योग्य कारवाईचे आश्‍वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय निलेश पाटील यांनी घेतला.
प्रांत कार्यालयात पाच कर्मचारी दारु पार्टी करीत असल्याचे उघड झाल्यानंतर निलेश पाटील यांच्या तक्रारीनुसार त्यापैकी चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र पाचवा इसम हा व्हिडीओ चित्रीकरणामध्ये स्पष्ट बसलेला दिसत असताना कारवाई का करत नाही असा सवाल पाटील यांनी करीत त्या इसमला जर नोकरी वरून बडतर्फ केला नाही तर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता. या इशार्‍यानंतर निलेश पाटील यांना अलिबाग पोलिस ठाण्याकडून नोटीस बजावण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिस बंदोबस्तात त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात आले होते.

Exit mobile version