| पुणे | प्रतिनिधी |
लोणावळ्यात पर्यटकांची नेहमीच खूप गर्दी असते. याच लोणावळ्यातील प्रसिद्ध चौधरी वडापाव दुकानात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नुकत्याच केलेल्या तपासणीत, या दुकानाच्या किचनमध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळल्या. सडलेले बटाटे, उंदराने कुरतडलेला भाजीपाला आणि अस्वच्छता आढळून आली. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
चौधरी वडापावच्या किचनमध्ये आरोग्याच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे तपासणीत उघड झाले. किचनमध्ये खूप घाण होती. उंदरांनी धुमाकूळ घातला होता. तसेच, खराब अन्नसामग्री साठवलेली होती. धक्कादायक बाब म्हणजे, काही सडलेले आणि उंदरांनी खाल्लेले बटाटे वडापावमध्ये वापरले जात होते. दुकानात साफसफाईकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले गेले होते. कामगार हातमोजे किंवा टोपी न वापरता वडापाव बनवत होते. हात धुण्याची पुरेशी सोय नव्हती. स्वयंपाकघरात झुरळे आणि उंदीर फिरत होते.
हे दुकान लोणावळ्यातील मध्यवर्ती भागात आहे. याच परिसरात अनेक हॉस्पिटल्स आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, नर्स, डॉक्टर आणि पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी येतात. लोणावण्यासारख्या पर्यटनस्थळी जीथे पर्यटकांची सतत ये-जा असते, अशा ठिकाणी हा किळसवाणा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर अन्न व औषध प्रशासनाने चौधरी वडापाव सेंटरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने नागरिकांना अशा गैरव्यवहार करणाऱ्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.
लोणावळ्यातील उपहारगृहात उंदरांनी खाल्लेल्या बटाट्यांचे वडापाव
