आग लागल्याने वाहतूक एकेरी
। पोलादपूर । प्रतिनिधी ।
कशेडी घाटात मच्छीने भरलेला कंटेनर पलटी झाल्याची घटना घडली. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर सोमवारी (दि.28) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अलिबाग येथून रत्नागिरीकडे जाणारा मच्छीचा कंटेनर कशेडी घाटातील धामणदेवी गावाजवळ कलंडला. उन्हामुळे कंटेनरच्या डिझेल टँकजवळून धुराचे लोट उठू लागले. डिझेल टँकजवळ धूर निघत असल्याने दीड किलोमीटर अंतरावरील एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस आणि महाड एमआयडीसी अग्निशमन दल अपघातस्थळी पोहोचले.
पोलीस उपनिरीक्षक सतीश पवार यांच्यासह महिला पोलिस अंमलदार जयश्री सरणेकर, सुतार, सौरव जाधव, बीट मार्शल रामेश्वर साळुंखे, दामिनी पथक शीतल बनसोडे, केतकी सकपाळ यांनी अपघाताच्या ठिकाणी जाऊन जखमी चालकाला ॲम्बुलन्समधून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात रवाना केले. यावेळी महाड औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन दलाचे सब ऑफिसर चव्हाण, सुरेंद्र मोरे, विशाल म्हात्रे, विजय साठे, प्रवीण चिंचोले आदींनी कंटेनरच्या डिझेल टँकजवळून निघणाऱ्या धुरावर पाण्याचा मारा करून आग पुर्णपणे नियंत्रणात आणली. तब्बल दीड तासानंतर महाड एमआयडीसीच्या अग्निशमन दलाने आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवून कलंडलेला कंटेनर जेसीबीच्या मदतीने रस्त्याच्या कडेला उभा केला.






