नागोठणे रोहा मार्गावर मोठ्या प्रमाणात सांडले होते ऑईल
| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणेजवळील सर्कल वरुन रोहाकडे जाण्यासाठी असलेल्या पुलापासून ते आमडोशी फाट्याच्या अलिकडील अंतरात ऑ ईल सांडले होते. याची माहिती मिळताच नागोठणे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक हरेश काळसेकर यांनी तात्काळ दखल घेत रस्त्यावर माती टाकण्याचे काम यंत्रणेकडून करुन घेतल्याने संभाव्य अपघात टळले. ट्रकमधील ड्रम मधून ऑ ईल सांडण्याची ही घटना शुक्रवारी (दि.9) सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. नागोठणे पोलिस ठाण्याचे सपोनि हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जतेंद्र पाटील, सत्यवान पाटील, समीर पाटील, अमोल नलावडे या पोलिसांचे पथक उपाययोजनेच्या या कार्यात उपस्थित होते.
यासंदर्भात उपलब्ध झालेल्या माहितीनुसार शुक्रवार दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास धाटाव एम.आय.डी.सी. मधील दिपक नायट्रेट या कंपनीकडे ऑ ईलचे ड्रम घेऊन जाणा-या ट्रकमध्ये ठेवण्यात आलेल्या ड्रम मधून झालेल्या ऑ ईल गळतीमुळे नागोठण्यातील रिलायन्स चौक पासून अंबा नदीवरील पुल मार्गे नागोठणे, वरवठणे, भिसे खिंड दिशेला जाणार्या रस्त्यावर सुमारे 4 किलोमीटरच्या अंतरावर रस्त्याच्या डाव्या बाजूला मोठ्या प्रमाणात रस्त्यामध्ये ऑईल सांडले होते. त्याची माहिती जागरुक नागरिकांकडून नागोठणे पोलीस ठाण्याला मिळताच नागोठण्याचे सपोनि हरेश काळसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नागोठणे पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले.
रस्त्यावर चार किलोमीटरच्या अंतरात मोठ्या प्रमाणात ऑ ईल सांडल्याचे पोलिस पथकाच्या लक्षात आले. त्यामुळे रस्त्यावर वाहने घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून त्या ठिकाणी माती टाकून अपघातास प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचे पोलिस पथकाच्या लक्षात आले. त्यानंतर सोशल मिडिया व प्रत्यक्ष फोनवर नागरिकांना माती उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यावेळी कोंडगाव गावचे सामाजिक कार्यकर्ते नितिन राजीवले यांनी तात्काळ ट्रॅक्टर ट्रॉलीद्वारे माती भरून आणली आणि स्वतःसह हेल्पर देऊन मदत केली. ही माती टाकण्याचे काम दोन तास सूरू होते. रस्त्यावर माती टाकल्याने संभाव्य होणारे अपघात रोखता आले व वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. दरम्यान ऑईल सांडत असल्याचे लक्षात येताच ट्रक चालकाने गाडी थांबविली होती. नंतर कंपनीचे कर्मचारी आल्यानंतर ही गळती थांबवून हा ट्रक धाटावला कंपनीत नेण्यात आला.