| पोलादपूर | प्रतिनिधी |
पोलादपूर-महाबळेश्वर रस्त्याची दुरुस्ती मोठ्या प्रमाणात सुरू असून, येथील खड्ड्यांनी देखील जीवघेणे स्वरूप धारण केले आहे. अशातच शनिवारी (दि.17) दुपारी वाकण येथील आशा सेविका स्कूटरवरून घराकडे जात असताना येथील खड्ड्यामध्ये त्यांचा तोल जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पनवेल येथे पाठविण्यात आले. मात्र, रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पोलादपूर ते महाबळेश्वर, वाई आणि सुरूर या रस्त्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. तत्पूर्वी 2021 च्या अतिवृष्टी काळामध्ये या रस्त्याच्या मार्गावर अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे, तसेच रस्ता दरीमध्ये वाहून गेल्यामुळे या रस्त्याचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. मात्र, पोलादपूर शहरापासून काही अंतरावर रानबाजिरे फाट्यापर्यंत हे काम थांबले असून, या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आणि अपूर्ण मोऱ्यांच्या कामांमुळे वाहतूक धोकादायक झाली आहे.
दरम्यान, शनिवारी दुपारच्या सुमारास वाकण येथील आशा सेविका वनिता साने (51) या स्कुटरवरून पोलापूर-महाबळेश्वर या रस्त्यावरून घराकडे जात होत्या. त्या रानबाजिरे गावानजीक आल्या असता, येथील खड्ड्यात त्यांची स्कुटर आदळली. त्यात त्यांचा तोल जाऊन त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर तात्काळ पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांची परिस्थिती अधिकच गंभीर असल्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी पनवेलला हलविण्यात आले. मात्र, वनिता साने यांना रुग्णवाहिकेतून नेत असताना माणगाव दरम्यान त्यांची प्रकृती अत्यंत खालावली. त्यानंतर रुग्णवाहिकेतील डॉक्टराने त्यांची तपासणी केली असता, त्यांनी मृत घोषीत केले. या घटनेमुळे पोलादपूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन अजुन किती बळी गेल्यावर अपूर्ण रस्त्याची कामे पुर्ण करणार, असा सवाल स्थानिकांमधून विचारला जात आहे.
खड्ड्याने घेतला आशा सेविकेचा जीव
