अॅड. तुषार पाटील यांची मागणी
। पनवेल । वार्ताहर ।
जेएनपीटी हे देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक आहे. येथे मालाची ने-आण करण्याकरिता अनेक ठिकाणाहून ट्रेलर, कंटेनर नियमित ये-जा करत असतात. यामुळे या मार्गावर एकंदरीतच अवजड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या अनुषंगाने जवळपास 3 हजार कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण करण्यात आले आहे. याचबरोबर या मार्गिका काँक्रीट करण्यात आल्या आहेत. मात्र, सद्यस्थितीत या मार्गावर भलेमोठे खड्डे पडले असून अपघाताला निमंत्रण मिळत आहे. यामुळे जेएनपीटी महामार्ग व सर्व्हिस रोडवरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवक प्रदेश सरचिटणीस अॅड. तुषार पाटील यांनी केली आहे. याबाबत त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पनवेल कार्यालयाचे प्रकल्प अधिकार्यांची भेट घेऊन निवेदनही दिले आहे.