पोल्ट्री व्यवसाय कमी होण्याच्या मार्गावर

औद्योगिकीरणामुळे जमीनी संपादन करण्याची प्रकीया वेगात

। अलिबाग । प्रतिनिधी ।

जिल्ह्यात वाढत्या औद्योगिकीकरणामुळे गावांसह शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम गावा शेजारी उभ्या असलेल्या पोल्ट्री व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, उरण, खालापूर या परिसरातील पोल्ट्री बंद होऊन ती जागा गोडावूनसाठी भाड्याने दिल्या जात आहे. त्यामुळे या भागातील पोल्ट्री व्यवसाय कमी होऊ लागला आहे.

जिल्ह्यामध्ये दोन हजार पेक्षा अधिक पोल्ट्री व्यवसायिक आहेत. सुमारे 40 लाख पेक्षा अधिक पक्षी वाढवले जातात. त्यांचे संगोपन केले जाते. या व्यवसायातून सुमारे 65 हजार पेक्षा अधिक जणांना रोजगार मिळतो. पोल्ट्री व्यवसायाला गती देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वेगवेगळ्या योजनादेखील राबवून बेरोजगारांना रोजगाराचे साधन खुले करीत आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात हा व्यवसाय ग्रामीण भागात होत आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस औद्योगिकीरणामुळे जमीनी संपादन करण्याची प्रकीया वेगात सुरु आहे. त्यात शहरीकरण व गावांचा विस्तार झपाट्याने होऊ लागला आहे.

मुंबईच्या अगदी जवळ असलेली जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, खालापूर, उरण या तालुक्यांमध्ये वेगवेगळे प्रकल्प येऊ घातले आहेत. या तालुक्यांमध्ये शहरीकरण वेगात वाढत आहे. वेगवेगळे उपक्रम या तालुक्यांमध्ये आले. त्यामुळे शहराजवळ पोल्ट्रीच्या जागी मोठ मोठे गोडाऊन उभे राहिले आहेत. या गोडावूनमधून मोठ्या प्रमाणात आर्थिक स्त्रोत प्राप्त होत असल्याने पोल्ट्रीच्या जागी गोडाऊन उभे राहण्याचे प्रमाण वाढत आहेत. जमीनीला भाव मिळत असल्याने गोडावूनसाठी भाडे चांगल्या प्रकारे मिळत आहे. मात्र पोल्ट्री व्यवसायातून तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या भागांमध्ये गोडावूनसाठी जागा देण्याचे प्रमाण वाढत आहे.

पनवेल, खालापूर, कर्जत, उरण या भागात जमीनीला महत्व वाढू लागले आहे. जमीन विक्रीचे व्यवहार वाढत आहेत. त्यामुळे पोल्ट्री, फार्म हाऊसच्या जागी ती जागा भाड्याने देण्यावर अधिक भर दिला जात आहे. यातून चांगले आर्थिक स्त्रोत मिळत आहे.

डॉ. रत्नाकर काळे
उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन विभाग, रायगड


Exit mobile version