। मुंबई । दिलीप जाधव ।
खालापूर तालुक्यातील बीडखुर्द ग्रामपंचातीच्या हद्दीतील प्रदूषण करणारे वरदविनायक पोल्ट्री फार्म बंद करावे अशी मागणी शेकापक्षाचे ज्येष्ठ आ.जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
या पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांवर प्रक्रिया करीत पिल्लांची उत्पत्ती केली जाते. मात्र स्वच्छता केली जात नसल्यामुळे ग्रामस्थांना दुर्गंधीना तसेच प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. सदर पोल्ट्री फार्मवर कारवाई करण्यासाठी तेथील जय महालक्ष्मी सेवा संस्था तसेच ग्रामस्थांनी अनेक वेळा तहसीलदार, खालापूर पोलीस स्टेशन यांच्याकडे लेखी अर्ज करून तक्रार केली असताना ही त्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही असं जयंत पाटील यांनी सांगितले.
सदर पोल्ट्री फार्म मधील पक्षांची विष्ठा, सांडपाणी, अंड्यांची कवचे, उपजत मृत्यू पक्षी तसेच जैविक कचरा नदीपात्रात सोडले जाते तसेच घाणीचा साथ उघड्यावर असल्यामुळे परिसरात पसरलेल्या दुर्गंधीमुळे तसेच प्रदूषणामुळे तेथील ग्रामस्थांच्या आरोग्यास व जीवितास धोका निर्माण झाला असल्यामुळे सदर पोल्ट्री त्वरित बंद करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हणाले की ग्रामस्थांच्या तक्रारीनुसार सदर पोल्ट्री मालकाला सूचना देण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायत बीडखुर्द यांनी ठराव करून सदर पोल्ट्री फार्म बंद करण्याचा ठराव केला असून सदर ठरावानुसार खालापूर तहसीलदार यांनी ग्रामपंचातीला कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोल्ट्री फार्मचे मालकाने ग्रामपंचायतीने केलेल्या कार्यवाही विरुद्ध पनवेल दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे.