रंगकाम करताना कारागिरांना अडथळा
रात्र-दिवस काम करण्यास व्यत्यय
| उरण । वार्ताहर ।
गणेशोत्सवाला अवघा आठवडा शिल्लक असल्याने उरण परिसरातील मूर्तिकारांची मूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू झाली आहे. मूर्ती कार्यशाळांमध्ये दिवस-रात्र या मूर्तिकारांचे हात गणेशमूर्ती घडवत आहेत. मात्र दररोज तासनतास खंडित होणार्या वीज पुरवठ्यामुळे मूर्तिकार हैराण झाले आहेत.
तालुक्यात शाडूच्या मातीपासून मूर्ती बनविण्यासाठी चिरनेर गाव प्रसिद्ध आहे. चिरनेरमधील प्रामुख्याने कुंभार समाजाची लोकं हा परंपरागत गणेशमूर्ती बनविण्याचा व्यवसाय करतात. चिरनेरमध्ये साधारण 30 ते 35 गणपती बनविण्याचे कारखाने आहेत. यामध्ये सुमारे पाच हजार लहान-मोठ्या मूर्ती तयार केल्या जातात. चिरनेरच्या गणेशमूर्तींना कोळी समाजातील लोकांकडून जास्त मागणी असते.
तालुक्यातील करंजा, मोरा आणि दिघोडा या कोळी समाजाची वस्ती असलेल्या गावांतून मोठी मागणी असते. पण चिरनेरमधील हे मूर्तिकार एकीकडे आपली कला जोपासण्याची धडपड करत आहेत. तर दुसरीकडे गणपतीसाठीचे रंग, मातीचे वाढलेले भाव आणि विजेच्या खेळखंडोबामुळे गणपती सुकविण्यापासून ते रंगकाम करताना या कारागिरांना मोठा अडथळा येत आहे. त्यामुळे रात्र-दिवस काम करूनही गणेशमूर्ती पूर्ण करण्यात अडचणी येत असल्याने त्याचा परिणाम या मूर्तिकारांच्या व्यवसायावर देखील झाला आहे.
मूर्तींना परदेशात मागणी
भूमिहीन असलेल्या या समाजातील ही लोकं उन्हाळ्यात मातीची भांडी बनविण्याचा व्यवसाय करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील गणेशमूर्तींना मागणी वाढल्याने व्यवसायाचे स्वरूप आलेल्या येथील कारागिरांनी व्यवसायात चांगले बस्तान बसविले आहे. चिरनेरच्या मूर्तींचे रंगकाम हे वेगळे आकर्षण असते. महागडे रंग वापरून जास्तीत जास्त मूर्ती आकर्षक कशी दिसेल यासाठी येथील मूर्तिकारांची धडपड असते. या गावातील नंदकुमार चिरनेरकर, गजानन चौलकर या मूर्तिकारांच्या मूर्तींना विविध शहरांतून मोठी मागणी असते. यातील काही मूर्तिकारांच्या मूर्ती परदेशीही गेलेल्या आहेत.
सतत पाऊस पडत अडल्याने लाईट ट्रिप होत होती. त्यानंतर दोन वेळा गाडीने पोलला धडक दिल्याने वीज खंडित झाली होती. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणचे पथक सतत कार्यरत आहे. तसेच गणेशोत्सवात अवरित वीजपुरवठा सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
विजय सोनावणे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण, उरण