42 हजार थकाबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित

आणखी 2 लाख ग्राहक रडारवर
कल्याण | वार्ताहर |
कल्याण परिमंडलात गेल्या तीन आठवड्यात वीजबिल थकबाकीपोटी जवळपास 42 हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील 500 रुपयांपेक्षा अधिकची थकबाकी असणारे 2 लाख 1 हजार 32 वीज ग्राहक रडारवर असून त्यांचा वीजपुरवठा कधीही खंडित केला जाऊ शकतो. चालू वीजबिलासह थकबाकीचा भरणा करून कठीण आर्थिक परिस्थितीत असलेल्या महावितरणला सहकार्य करावे व अखंडित वीज सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी केले आहे.
गेल्या तीन आठवड्यात कल्याण मंडल एक (कल्याण व डोंबिवली) अंतर्गत 5 हजार 465, कल्याण दोन मंडल दोन (उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, शहापूर, ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग) अंतर्गत 7 हजार 972, वसई मंडल (वसई व विरार) अंतर्गत 13 हजार 214 आणि पालघर मंडल (वसई व विरार वगळून उर्वरित पालघर जिल्हा) अंतर्गत 15 हजार 250 ग्राहकांचा तसेच 25 पाणीपुरवठा योजना व 149 पथदिवे जोडणीचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. यातील 20 हजार 211 ग्राहकांनी चालू वीजबिलासह थकबाकी आणि पुनरजोडणी शुल्काचा भरणा करून वीजपुरवठा सुरळीत करून घेतला आहे. तर सप्टेंबर महिन्यापूर्वी 1 लाख 65 हजार थकाबाकीदारांचा शिवाय 311 पाणीपुरवठा योजना व 786 पथदिवे जोडण्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

Exit mobile version