टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल शहरातील अत्यंत महत्त्वाच्या व वर्दळीच्या भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. विकासकामांच्या खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तुटण्याचे प्रमाण वाढल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता. त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून एका विशेष समन्वय बैठकीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आता टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पनवेल शहरात सध्या काँक्रिटीकरणाचे आणि महानगर गॅसच्या जोडणीचे काम जोमाने सुरू आहे. मात्र, महापालिका आणि महावितरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने कंत्राटदारांकडून खोदकाम करताना वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत होते. त्यामुळे शहरातील टिळक रोड, महात्मा फुले रोड, एचओसी कॉलनीच्या मागील रोड, गडकरी मार्ग आणि महात्मा गांधी मार्ग या अत्यंत महत्त्वाच्या व वर्दळीच्या भागातील नागरिक गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे हैराण झाले आहेत. नियमानुसार, रस्त्याच्या कामात आडव्या येणाऱ्या वाहिन्या कंत्राटदाराने स्वखर्चाने अंडरग्राउंड करणे आवश्यक असताना, प्रशासकीय ताळमेळ नसल्याने या कामात दिरंगाई होत होती. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नगरसेवक ॲड. प्रथमेश सोमण यांनी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच, एका विशेष समन्वय बैठकीची देखील मागणी केली होती. सोमण यांच्या सूचनेनुसार व मागणीनुसार आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकिचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत, आतापसासन कोणत्याही रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी महापालिका, महावितरण आणि संबंधित कंत्राटदार यांची टास्क फोर्स प्रत्यक्ष जागेवर जाऊन समन्वय साधेल. त्यामुळे खोदकामात वाहिन्या तुटण्याचे प्रकार थांबणार असून नागरिकांना विनाकारण अंधारात राहावे लागणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीला अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, शहर अभियंता संजय कटेकर, महावितरणचे अधीक्षक अभियंता माने, शहर अभियंता सातपुते व देशमुख उपस्थित होते. तसेच, राहुल गोगटे, महेश सावंत, प्रसाद सोनावणे, अभिजीत साखरे, अर्जुन परदेशी, प्रकाश म्हात्रे, नरेश नरसिंगे, अराफत पटेल आणि मिलिंद निंबाळकर यांनी देखील बैठकीत सहभाग घेतला. प्रथमेश सोमण यांच्या या सक्रिय पुढाकारामुळे शहरातील प्रलंबित वीज समस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे.
