महावितरणचे अधिकारी ठेकेदारांवर फिदा

xr:d:DAFsn7WZUOg:1271,j:3652833494717991405,t:24010205

गरज नसताना दुरुस्तीची काम जोरात; दिवसभरात चार-चार तास वीजपुरवठा खंडित

| पेण | प्रतिनिधी |

गेली आठ दिवस पेण शहरात विजेचा लपंडाव सुरु आहे. याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे अधिकारी आहेत, असा आरोप पेणमधील नागरिक करीत आहेत. गेली आठ दिवस पेण शहरातील विजेच्या तारा बदलणे, पोल बदलणे हे काम सुरु आहे. खरं पाहता, या विजेच्या तारा तातडीने बदलणे काहीही गरज नसतानादेखील ठेकेदाराचे भले व्हावे म्हणून अधिकारी नागरिकांना वेठीस धरुन दिवसभरात चार ते पाच तास लाईट बंद करत आहेत, असे बोलले जात आहे.

मंगळवारी सकाळी 10.30 ला वीजपुरवठा बंद करण्यात आला. तो दुपारहून 4 नंतर सुरू झाला. तीच अवस्था गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारीची होती. शनिवारी सकाळी 9.45 ला वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तो 4.30 वाजले तरी सुरू करण्यात आला नव्हता. त्यामुळे याच्या मुळाशी आमचे प्रतिनिधी गेल्यावर असे लक्षात आले की, पेण येथील महावितरणच्या अभियंत्यांचे आणि लाईट तारा, पोल बदलणार्‍या ठेकेदारांचे काही हितसंबंध आहेत. ठेकेदाराचे भले करण्यासाठी कनिष्ठ अभियंते वीजपुरवठा बंद करीत आहेत. अशा अधिकार्‍यांविरुद्ध वरिष्ठांनी त्वरित कारवाई करणे गरजेचे आहे. परंतु, वरिष्ठ अधिकारीदेखील कानाडोळा करीत असल्याचे निदर्शनास येत आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, वीजपुरवठा का बंद केला, याबाबत विचारणा करण्यासाठी पेण उपअभियंता खोबरागडे यांना भ्रमणध्वनीवरुन संपर्क करुन विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मला माझ्या अधिकार्‍यांकडून माहिती घ्यावी लागेल. याचाच अर्थ, कनिष्ठ अभियंते आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कोणतीच कल्पना देत नाहीत. स्वतःच्या मनमानीने ते ठेकेदारांच्या भल्याचाच विचार करीत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.

Exit mobile version