आरोग्याशी खेळ; प्रशासनासह पाणी सोडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
| अलिबाग | प्रतिनिधी |
चिंचोटी येथील ग्रामस्थांनी पाण्यासाठी अनेक वेळा लढा दिला आहे. मात्र, त्याच गावांतील नागरिकांना प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे दुर्गंधीयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे. जलजीवन योजनेअंतर्गत बांधलेल्या विहीरीत कुजलेल्या अवस्थेत कुत्रा असतानही त्याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. चिंचोटीमधील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ प्रशासनाने केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्या कार्यालयात लेखी तक्रार करण्यात आली आहे.
चिंचोटी गावातील नागरिकांना पिण्याचे पाणी सोडण्याचे काम दररोज केले जाते. पिण्याच्या पाण्याला घाणेरडा वास येतोय म्हणून गावामध्ये चर्चा सुरू झाली. गावातील लोकांनी ही बाब पाणी सोडणाऱ्यांच्या निदर्शनासही आणून दिली. तरीही या मेलेल्या कुत्र्याकडे पाणी सोडणाऱ्यांंनी दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्रामपंचायत चिंचोटीच्या ग्रामसेवकांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला; परंतु संपर्क झाला नाही. विहिरीमध्ये कुत्रा पडून तो कुजून त्यावर किडे पडलेले घाणरेडे पाणी नागरिकांना पाजण्याचे काम ग्रामपंचायत करीत आहे.
बंद पडलेली पाणी योजना सुरु करण्यासाठी गावांतील ग्रामस्थ, महिलांनी एकत्र येऊन लोकवर्गणी काढली. गावातील पाणी सोडणारे नेमून त्यांना दर महिन्याला दहा हजार रुपये मानधन देण्याचे ठरले. दोघांमार्फत पाणी सोडण्याचे काम केले जाते. मात्र याच विहिरीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून मृत झालेला कुत्रा दिसून आला. तो कुजलेल्या अवस्थेत होता.
चिंचोटी ग्रामस्थांना दुषित पाणी पाजणारे तसेच ग्रामपंचायत चिंचोटीचे प्रशासक, ग्रामसेवक यांच्याविरूध्द मानवी जीवितास धोका पोहोचवणे. तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणणे याबाबतीत भारतीय न्यायदंडसंहिता 2023 नुसार तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ग्रामस्थ प्रमोद पाटील यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.
जलजीवन मिशन योजनेतून बांधलेल्या विहिरीतून सध्या चिंचोटी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठा केला जातो. या विहिरीमध्ये कुत्रा मरून त्यावर किडे पडून दुर्गंधीयुक्त पाणी प्यावे लागत आहे. मानवी जीविताला हानी पोहचवण्याचा हा एक प्रकारचा गुन्हा आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करावा.
– प्रमोद पाटील, तक्रारदार, चिंचोटी
जलजीवन योजनेत कोट्यवधी रुपये खर्च करुनही पाण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. या योजनेबाबत सुरुवातीपासून अनेक तक्रारी झाल्या. पाण्याचा प्रश्न सोडवूूच असे म्हणणारे लोकप्रतिनिधी आता मवाळ का बनले आहेत? चिंचोटी ग्रामस्थांना देण्यात येणाऱ्या पाण्यात कुजलेल्या अवस्थेत कुत्रा सापडणं, ही लाजिरवाणी बाब आहे. प्रशासन नेमकं काय करतंय, ही जबाबदारी कोण घेणार? चिंचोटी ग्रामस्थांचा पाणीप्रश्न तातडीने सोडवा, अन्यथा शेकाप तीव्र आंदोलन करेल.
– चित्रलेखा पाटील, शेकाप प्रवक्त्या तथा सोशल मिडिया सेल अध्यक्षा