दोन्ही मार्ग पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले
| पोलादपूर | वार्ताहर |
मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वरील कशेडी घाटाला पर्यायी दोन्ही भुयारी मार्गावरील विद्युत प्रकाशझोत आणि व्हेंटीलेशनसाठीचे पंखे वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याने सध्या पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले झाले आहेत.
कशेडी घाटातील भुयारी मार्गातील वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी नव्याने सुरू झालेल्या भुयारी मार्ग संपल्यानंतर खेड बाजूला भुयार संपताच कोकणाचा रस्ता मुंबईच्या भुयाराकडे जाणाऱ्या रस्त्याला जोडला आहे. यामुळे एकाच रस्त्यावर दोन्ही बाजूला जाणाऱ्या वाहने रात्री समोरासमोर येत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. भुयारी मार्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील विद्युतप्रकाश योजना अद्याप रत्नागिरी जिल्ह्यात सुरू न झाल्याने अपघाताचा धोका अधिकच वाढला आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्गाची पाहणी करण्यासाठी पनवेल पळस्पे ते कातळी भोगावच्या भुयारी मार्गापर्यंत दौरा केला. यावेळी रिलायन्स इन्फ्राचे ठेकेदार एसडीपीएल कंपनीनेच भुयारी मार्गातील विद्युत पुरवठ्यासाठी पाठपुरावा करण्याचे स्पष्ट निर्देश देऊन राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर काहीशी नाराजी व्यक्त केली होती. यामुळे शिंदे डेव्हलपर्स प्रोजेक्ट लिमिटेडचे शिवतारे यांनी महावितरणकडे स्वत: पाठपुरावा केला आणि दोनही भुयारांतर्गत विद्युत प्रकाश झोत आणि वायूविजनासाठीचे 10 एक्झॉस्ट फॅन्स रात्रंदिवस सुरू राहण्यासाठी वीजपुरवठा सुरू करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी, दोन्ही भुयारी मार्गातील अंतर्गत गळती दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असले तरी आतापर्यंत गळती रोखण्यासाठी ग्राउंटींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येऊन 60 टक्केच अंतर्गत पाणीगळती थांबविण्यात यश आले असून उर्वरित गळती कशी थांबवायची, याबाबतचे प्रयत्न तज्ज्ञ मार्गदर्शन घेऊन थांबविण्यात यश येईल, अशी आशा व्यक्त केली.
भुयारी मार्गाचा वापर उन्हाळी सुट्टी आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांनी अधिक पसंत केल्याने भुयारी मार्ग वाहतुकीस सुसज्ज होण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले होते. कशेडी घाटाचा पर्यायी भुयारी मार्ग हा 1.8 कि.मी. लांबीचा असून भुयारी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांसह संपूर्ण मार्ग सुमारे नऊ किलोमीटरचा आहे. यामुळे 45 ते 50 मिनिटांचा वळसा वाचून अवघ्या 12 ते 15 मिनिटांत रायगड जिल्ह्यामधील पोलादपूर ते रत्नागिरीतील खेडमधील कशेडीपर्यंतचा प्रवास शक्य
होणार आहे. दोन्ही भुयारांमध्ये वरील बाजूंनी 200 पथदीपांची उभारणी करण्यात आली असून, त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाली आहे या पैकी बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
दोन्ही भुयारी मार्गांमध्ये सध्या 24 तास अखंड वीजपुरवठा सुरू होणार असून, ऐन उन्हाळयातील गळती रोखण्यासाठी ग्राउंटींग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. अलिकडेच, नवीन भुयारी मार्ग संपल्यानंतर खेडबाजूला कोकणात जाणारा भुयारी मार्गाचा ऍप्रोच रोड नादुरूस्त झाल्याने भुयारातून बाहेर आल्यानंतर शंभर मीटर्स अंतरापूर्वीच मुंबईकडे जाणाऱ्या भुयाराच्या ऍप्रोच रोडला जोडण्यात आल्याने रात्रीच्यावेळी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड बाजूला ऍप्रोच रोडच्या दूतर्फा उभारलेले विद्युत प्रकाशझोत वीजपुरवठ्याअभावी सुरू झाले नसल्याने अपघाताच्या धोक्याची तीव्रता वाढली आहे. सद्यस्थितीत वीजपुरवठा सुरू झाल्याने दिवसाही लख्ख प्रकाशझोतामध्ये वाहन भुयारी मार्गात चालविताना वाहनचालकांना कोणत्याही प्रकारचा ताण वाटत नसल्याचे दिसून येत आहे.