| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भाजपला सोडून सगळे पक्ष एकत्र आले तर येणार्या लोकसभा निवडणुकीत विरोधकांना मोठं यश मिळू शकते, असे सर्वेक्षण सीएसडीएस या संस्थेने काढले आहे.
निवडणुकांवर अभ्यास करणार्या सीएसडीएस या संस्थेच्या वतीने एक आकडेवारी जारी करण्यात आली आहे. हा आकडा मागच्या वर्षी सर्व पक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीवरुन काढला आहे. भाजपला सोडून सगळे पक्ष एकत्र आले तर येणार्या लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळू शकते, असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
पुढच्या वर्षी देशात लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांसाठी आता केवळ एक वर्ष बाकी आहे. येत्या निवडणुकीसाठी भाजप, काँग्रेस आणि इतर सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सध्या जेवढे सर्वे येत आहेत त्यामध्ये भाजपलाच बहुमत मिळेल, असं दिसतंय. देशामध्ये भाजप तिसर्यांदा सत्तेत येईल, असं सांगितलं जात आहे. परंतु एक फॉर्म्युला असा आहे ज्यामुळे विरोधकांना सहजगत्या सत्ता मिळू शकते. परंतु तो रस्ता खूप अवघड आणि अनिश्चित आहे.
सीएसडीएसच्या आकड्यांच्या हवाल्यावरुन एक रिपोर्ट तयार केला आहे. भाजप विरोधामध्ये जर सर्व पक्ष एकत्र आले तर भाजपला 235 ते 240 जागांवर समाधान मानावं लागेल. दुसरीकडे विरोधी पक्षांना 300 ते 305 जागा मिळू शकतात. विशेष म्हणजे 2019 मध्ये भाजपला 303 जागाांवर विजय मिळाला होता, तर विरोधकांना 236 जागांवर समाधान मानावं लागलं होतं.
सीएसडीएसने मागच्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि इतर पक्षांच्या मतांच्या टक्केवारीवरुन हा आकडा काढला आहे. यासह येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या मतांमध्ये एक टक्का घसरण होऊ शकते. त्यामुळे जागा कमी होऊन 225-230 पर्यंत खाली येऊ शकतात. तर विरोधी पक्षांना 310-325 जागा जिंकता येऊ शकतात. जर भाजपचे दोन टक्के मतं कमी झाले तर त्यांच्या जागा 210 ते 215 पर्यंत खाली येऊ शकतात. तर विरोधी पक्षांचा आकडा 325 ते 330 होऊ शकतो. सीएसडीएसच्या या आकडेवारीमुळे विरोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यासाठी भाजपवगळून इतर पक्षांना एकत्र यावं लागेल, हेही तितकंच खरं.