महाडची प्रतीक्षा पॉवरफुल्ल

न्यूझीलंडमध्ये डौलाने फडकला भारताचा तिरंगा; पॉवरलिफ्टिंगमध्ये सिनिअर गटात पटकाविले सुवर्णपदक

| महाड | प्रतिनिधी |

महाड तालुक्यातील प्रतीक्षा गायकवाड शिगवण हिने न्यूझीलंडमध्ये पार पडलेल्या कॉमनवेल्थ पॉवरलिफ्टिंग वुमेन्स चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत सुर्वणपदक पटकावत भारताचा तिरंगा सातासमुद्रापार डौलाने फडकविला आहे. +84 किलो वजनी गटातील सिनिअर गटात प्रतीक्षाने 210 स्क्वॅट, 130 बेेंच आणि 185 डेड लिफ्ट असे एकूण 525 किलो वजन उचलून सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. यापूर्वीही हाँगकाँग येथे पार पडलेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत अशाच पद्धतीची बहारदार कामगिरी करून प्रतीक्षाने देेशाचा तिरंगा परदेशात झळकावला होता.

महाड तालुक्यातील बिरवाडी, आसनपोई या गावातील प्रतीक्षाने ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथेही काही वर्षे रहिवास करून वेटलिफ्टिंग, पॉवरलिफ्टिंगचे प्रशिक्षण घेतले. ती सध्या मध्य रेल्वेत सेवत असून, तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. महाडच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेजातून उच्चशिक्षण घेत असतानाच तिने आपल्या खेळावर पूर्ण लक्ष केंद्रित केले. पॉवलिफ्टिंगसारख्या खेळात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले गाव, जिल्हा, तालुक्याचे नाव झळकावणार्‍या प्रतीक्षाच्या पाठीमागे कोणतेही आर्थिक बळ नसताना प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर तिने हे यश संपादन केले.

प्रतीक्षाच्या या यशात तिच्यामागे कायम सावलीसारखी साथ करणारी आई ज्येष्ठ समाजसेविका सुनिता गायकवाड यांच्याबद्दल ती कृतज्ञता व्यक्त करते. आईची साथ होती म्हणूनच मी हा पल्ला गाठू शकले, असे तिने नम्रतापूर्वक आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले. प्रतीक्षाचे वडील कॅप्टन बबनराव गायकवाड हे सैन्यदलातील माजी निवृत्त अधिकारी आहेत. त्यांनी कारगिल युद्धात शत्रूशी चार हात करून देशसेवा बजावली आहे. प्रतीक्षाने मिळवलेल्या यशाचे महाड पोलादपूर तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Exit mobile version