। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या संकुलामध्ये तसेच जिल्ह्यातील सर्व इंग्रजी, मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयामध्ये रायगडचे भाग्यविधाते स्व. प्रभाकर नारायण पाटील ऊर्फ भाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजमध्ये कार्यक्रमाची सुरुवात भाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून आणि विनम्र अभिवादन करून करण्यात आली, तसेच स्व. भाऊ यांच्या स्मृतीला उजाळा देण्यात आला. यावेळी सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि प्राचार्य उपस्थित होते. यानिमित्ताने शाळांमध्ये वाचन स्पर्धा, वृक्षारोपण तसेच वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या.
पीएनपी महाविद्यालयात भाऊंच्या जयंतीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. या निबंध स्पर्धेमध्ये प्रथम वर्ष बीएमधून रिया रवींद्र धसाडे प्रथम क्रमांक, तृतीय वर्ष वाणिज्य वर्गामधून दिशा चिंतामणी आगरकर हिने द्वितीय क्रमांक, तृतीय वर्ष विज्ञान विभागामधून सानिका अनिल म्हात्रे हिने तृतीय क्रमांक, तर प्रथम वर्ष बीएमधील पार्थ जितेंद्र भगत, हर्षाली संदीप नागावकर आणि द्वितीय वर्ष वाणिज्य विभागातील मिताली विनोद पाटील यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरविण्यात आले. भूगोल विभाग प्रमुख प्रा. दिनेश पाटील यांनी भाऊंची महती सांगितली. निबंध स्पर्धेचे परीक्षण कला व मराठी विभाग प्रमुख डॉ. नम्रता पाटील यांनी केले, त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना भाऊंचे चरित्र उलगडून दाखविले. महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे यांनी भाऊंची विचारधारा विद्यार्थ्यांसमोर मांडताना युवकवर्गाने भाऊंचा आदर्श घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले, तर महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. ओमकार पोटे यांनी आपल्या अध्यक्षीय वक्तव्यात भाऊंच्या कार्याला उजाळा दिला आणि निबंध स्पर्धेत सहभागी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रसिका म्हात्रे यांनी केले. कार्यक्रमासाठी आयक्यूएसी समन्वयक प्रा. केतकी पाटील, विज्ञान विभाग प्रमुख प्रा. पूजा पाटील, प्रा. मिलिंद घाडगे, सर्व प्राध्यापक तसेच विद्यार्थी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभागातील प्रा. योगिता पाटील, प्रा. रूपाली पाटील, प्रा. पूजा पाटील, प्रा. पायल देऊळकर, प्रा. साईनाथ पाटील यांनी प्रयत्न केले.