विराट-रोहित यांना दिला जाईल आराम
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 22 सप्टेंबर रोजी एकदिवसीय मालिका होणार आहे. भारतात होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड होणार आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती भारताच्या वरिष्ठ खेळाडूंना आराम देऊ शकते. यामध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश असेल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेनंतर आठवडाभरात विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
आज रात्री साडेआठ वाजता कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरोधातील वनडे मालिका सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर यांच्यासाठी अग्निपरीक्षा असेल. कारण, आशिया चषकात दोघांनाही तितकी संधी मिळालेली नव्हती. त्यामुळे विश्वचषकाआधी ही दोन्ही खेळाडूंसाठी ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका महत्वाची आहे. दोन्ही संघाना खेळण्यासाठी अखेरचे तीन सामने असतील. त्यानंतर विश्वचषकाचा थरार सुरु होणार आहे.
इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार, सिलेक्शन कमेटी विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांना आराम देऊ शकते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर लगेचच विश्वचषक स्पर्धा होणार आहे. अशा स्थितीत खेळाडूंवर ताण वाढणार आहे. भारताच्या मोठ्या खेळाडूंचा वर्कलोड कमी करण्यासाठी विश्रांती दिली जाऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
विराट कोहली बऱ्याच काळापासून क्रिकेट खेळत आहे, विश्वचषकापूर्वी त्याला विश्रांती देणे आवश्यक आहे. विश्वचषकात भारताला कमीत कमी नऊ सामने खेळावे लागणार आहेत. रोहितच्या बाबतीतही तेच आहे. त्यांनाही विश्रांतीची नितांत गरज आहे. वेगवान गोलंदाज बुमराहने दुखापतीतून सावरल्यानंतर भारतीय संघात पुनरागमन करत चमकदार कामगिरी केली. पण आता त्याला विश्रांतीची गरज आहे. रोहितच्या अनुपस्थितीत इशान किशनला सलामीची संधी मिळू शकते. भारतीय संघाच्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या यादीत ईशान आणि शुभमन गिलचा समावेश आहे. केएल राहुलला मधल्या फळीत संघात स्थान मिळू शकते. दुखापतीनंतर राहुलने पुनरागमन केले आहे. सध्या तरी श्रेयस अय्यरच्या शारीरिक क्षमतेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तो तंदुरुस्त राहिला तर त्याला संघात स्थान मिळू शकते.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिकेचं वेळापत्रक आशिया चषकानंतर टीम इंडिया मायदेशात ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. पहिला एकदिवसीय सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर रंगणार आहे. त्यानंतर 24 आणि 27 सप्टेंबर रोजी इंदौर आणि राजकोट येथे लढत होणार आहे. (तिन्ही लढती दुपारी 1.30 वाजता सुरू होतील.) विश्वचषकाच्या आधी होणारी ही वनडे मालिका तयारीसाठी महत्वाची आहे.
भारताविरोधात वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाची टीम पॅट कमिन्स (कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स कॅरी, नाथन एलिस, कॅमरून ग्रीन, जोश हेजलवुड, जॉश इंग्लिश, स्पेंसर जॉनसन, मार्नश लाबुशेन, मिचल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅथ्यू शॉर्ट, स्टीव स्मिथ, मिचल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, डेविड वॉर्नर, एडम जम्पा.