28 वर्षे सचिवपदाचा अनुभव; नवीन कार्यकारिणीचीही घोषणा
| अलिबाग | प्रतिनिधी |
क्षात्रैक्य माळी समाज संस्था, अलिबागच्या अध्यक्षपदी प्रदीप कृष्णाजी नाईक यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. कुरूळ येथील उंडीचे भाट सभागृहात झालेल्या संस्थेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या पहिल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारिणीचीही घोषणा करण्यात आली.
संस्थेच्या मागील महिन्यात झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 2027 ते 2032 या कालावधीसाठी नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली होती. या कार्यकारिणीची पहिली बैठक 29 नोव्हेंबर रोजी पार पडली. यावेळी मावळते अध्यक्ष द्वारकानाथ नाईक यांनी अध्यक्षपदासाठी प्रदीप नाईक यांच्या नावाची घोषणा केली. उपस्थित सदस्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या निवडीला एकमताने मान्यता दिली.
प्रदीप नाईक हे गेल्या 28 वर्षांपासून संस्थेचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांना संस्थेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. तसेच अलिबागचे माजी नगरसेवक, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लायन्स क्लबचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. विविध संस्थांमधील प्रशासकीय कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी प्रदीप कृष्णाजी नाईक, उपाध्यक्षपदी अभिजित राणे, मनोज राऊळ आणि शालिनी नाईक, सचिवपदी श्रीनाथ कवळे, सहसचिवपदी महेश कवळे, संतोष पाटील आणि अभय घरत, खजिनदारपदी रवींद्र वर्तक, तर सहखजिनदारपदी रमेश पाटील यांची निवड करण्यात आली. द्वारकानाथ नाईक, अविनाश राऊळ, श्रीकांत पाटील आणि रमेश नाईक यांची संस्थेच्या मुख्य सल्लागारपदी निवड झाली.
क्षात्रैक्य समाज संस्था अलिबागमधील माळी समाजाच्या सर्व पोटजातींतील समाज बांधवांना एकत्र आणून विविध सामाजिक उपक्रम राबविते. कुरूळ येथे संस्थेचे सर्व सुविधांनी युक्त वातानुकूलित सभागृह आहे. लग्नसमारंभ, सभा, मेळावे आणि संमेलनांसाठी हे सभागृह नागरिकांसाठी उपयुक्त ठरत आहे. याशिवाय कृषी प्रदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, गुणवंतांचा सत्कार, वृक्षारोपण आणि आरोग्य शिबिरांसारखे उपक्रम संस्था सातत्याने राबवित आहे. संस्थेच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्याने समाजाची अधिकाधिक सेवा करण्याचा मानस नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप नाईक यांनी यावेळी व्यक्त केला.
