प्रफुल्ल शिर्केची यशस्वी झेप

| माणगाव | प्रतिनिधी |

स्वप्नांना कष्टांची जोड, मनात जिद्द आणि कलेवर नितांत प्रेम असेल, तर गावाच्या मातीतूनही यशाची आंतरराष्ट्रीय शिखरे गाठता येतात, याचा प्रत्यय माणगाव तालुक्यातील प्रफुल्ल शिर्के यांच्या प्रवासातून येतो. वावे तर्फे निजामपूर या छोट्याशा गावात जन्मलेल्या प्रफुल्ल यांनी मनोरंजन क्षेत्रात गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने काम करत अभिनय, कला दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या कलाप्रवासाला आता ‌‘पीएम्स वाईफ‌’ या हिंदी फिचर फिल्मच्या माध्यमातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष ओळख मिळत आहे. प्रफुल्ल शिर्के यांनी रमा राघव, विठू माऊली आणि आशा यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या आहेत. छोट्या पडद्यावरील अभिनयासोबतच त्यांनी अनेक जाहिरातींच्या चित्रीकरणातही सहभाग घेतला आहे. मात्र, केवळ अभिनयापुरते मर्यादित न राहता त्यांनी कला दिग्दर्शनाच्या क्षेत्रातही आपले कौशल्य सिद्ध केले. माणगाव तालुक्यातील एका छोट्याशा गावातून सुरू झालेला हा प्रवास आज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांच्या व्यासपीठापर्यंत पोहोचला आहे. प्रफुल्ल यांचे यश हे केवळ त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाचे प्रतीक नसून, ग्रामीण भागातील नव्या पिढीतील कलावंतांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. त्यांच्या या यशस्वी वाटचालीचे माणगाव परिसरातून कौतुक होत आहे.

Exit mobile version