। अलिबाग । प्रतिनिधी ।
शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद केशव ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यातील कुसुंबळे येथे ही सभा रविवारी (दि. 05) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास होणार असल्याची माहिती शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी दिली.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील रहिवासी असणारे प्रमोद ठाकूर यांनी राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ग्रामपंचायत सरपंच ते पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. क्रीडा क्षेत्रातदेखील त्यांचे योगदान राहिले आहे. गुरूवारी (दि.26) डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यानिमित्ताने शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने कुसुंबळे येथे शोकसभा आयोजित केली आहे. शेतकरी कामगार पक्षाचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते, माजी नगरसेवक, आजी माजी सरपंच, उपसरपंच, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहवे, असे आवाहन शेकाप तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी केले.