| नवी मुंबई | प्रतिनिधी |
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असणाऱ्या विजय चव्हाण यांची दोघा मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे गळा दाबून हत्या केल्यानंतर आरोपींनी त्या हवालदारास रबाळे ते घणसोली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकलसमोर ढकलून दिल्याचे पोलिस तपासात समोर आलं आहे. वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात याप्रकरणी दोन मारेकऱ्यांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.1) पहाटे 5.25 ते 5.32 च्या सुमारास दोन अज्ञातांनी विजय चव्हाण यांना लोकल ट्रेनसमोर ढकलल्याचे लोकल मोटरमनने सांगितले. त्यानंतर मोटरमनने पोलिसांना संपर्क केला. लगेचच वाशी रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या तुकडीला दोन स्थानकांदरम्यान विजय चव्हाण यांना बेशुद्ध अवस्थेमध्ये दिसले. वाशी महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी विजय चव्हाण मृत असल्याचे पोलिसांना सांगितले.
प्राथमिक तपासावरुन विजय चव्हाण हे घटनेदरम्यान ऑफ ड्यूटी होते. त्यांच्या अंगावर पोलिसी गणवेश नव्हता. त्याशिवाय त्यांनी मद्यपानदेखील केले होते. त्यांना दोघे मारेकरी मद्यपान करण्यासाठी प्रवृत्त करत होते. दारु पाजल्यानंतर दोघांनी गळा दाबून चव्हाण यांची हत्या केली. त्यानंतर चव्हाण यांना आरोपींनी रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांदरम्यान येणाऱ्या धावत्या लोकलसमोर ढकलून दिले. आरोपी कोण आहेत, या हत्येमागे त्यांचा काय उद्देश होता हे अजूनही स्पष्ट झालेला नाही अशी माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. विजय चव्हाणांच्या मृतदेहाजवळ त्यांचा मोबाईल फोन आढळला. तपासाअंतर्गत पोलिसांनी फोन ताब्यात घेतला आहे. त्याशिवाय पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करायला सुरुवात केली आहे. विजय चव्हाण नववर्षाचे सेलिब्रेशन करुन घरी परतत असताना हा प्रकार घडला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.