| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
पाली नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीत पक्षाचा व्हीप झुगारल्याने नगराध्यक्षा प्रणाली शेळके यांच्यासह शिवसेनेच्या (शिंदे गट) नगरसेविका कल्याणी दपके व प्रतीक्षा पालांडे, नगरसेवक विनायक जाधव यांना अपात्र घोषित करण्यात आले होते. याबाबत रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला नगरविकास विभागाने स्थगिती दिली आहे. त्यामुळे प्रणाली शेळके पुन्हा नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.
त्या संदर्भातील आदेश अवर सचिव दत्तात्रय कदम यांनी दिले आहेत. गुरुवारी (दि.10) नगराध्यक्षा व तीनही नगरसेवकांनी आपला पदभार स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दिलेल्या आदेशाविरुद्ध शासनाकडे प्रणाली शेळके व इतर 3 नगरसेवकांनी अपील दाखल केले असून अपिलाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री व सक्षम प्राधिकारी यांच्या प्राप्त आदेशानुसार रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. तसेच ही स्थगिती जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रस्तुत आदेश प्रकरणी सक्षम प्राधिकारी यांचेकडे सुनावणी घेऊन अंतिम निर्णय होईपर्यंत देण्यात आली आहे.