शुभेच्छांची आरोग्यसेवेतून परतफेड!

प्रशांत नाईक यांचा वाढदिवस आरोग्य शिबिरातून साजरा

| अलिबाग | प्रतिनिधी |

शुभेच्छांचा आनंद स्वतःपुरता मर्यादित न ठेवता तो समाजाच्या आरोग्याशी जोडण्याचा आदर्श उपक्रम अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी वाढदिवसानिमित्त राबविला. सत्कार, हार-तुरे आणि जल्लोषाऐवजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य दिले. सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाच्या शुभेच्छांना समाजोपयोगी कृतीतून दिलेली ही परतफेड विशेष ठरली.

जलसापाडा, कस्टम ऑफिससमोर, अलिबाग येथे शनिवारी (दि. 21) सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत हे शिबीर पार पडले. प्रशांत नाईक यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. लायन्स क्लब अलिबाग यांच्या सौजन्याने आणि लायन्स हेल्थ फाऊंडेशन यांच्या सहकार्याने आयोजित या शिबिरात नागरिकांसाठी मोफत नेत्रतपासणी, मधुमेह, हिमोग्लोबिन आणि सर्वसाधारण आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक नागरिक आर्थिक अडचणी किंवा वेळेअभावी नियमित आरोग्य तपासणीकडे दुर्लक्ष करतात. अशा नागरिकांना मोफत तपासणीची संधी मिळावी आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश होता.

यावेळी लायन्स क्लबचे प्रदीप नाईक, अनिल म्हात्रे, प्रवीण सारनाईक, भगवान मालपाणी, महेंद्र पाटील तसेच गौतम पाटील, जनार्दन वरसोलकर, समीर ठाकूर, साक्षी पाटील, अश्विनी ठोसर, नीलम हजारे, निवेदिता वाघमारे, नागेश कुलकर्णी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. अदिती कीर, डॉ. सतीश निचिते, केतकी भगत, सिद्धी पाटील, प्राची केणी आणि कमलाकर पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. अलिबाग शहर पुरोगामी युवक संघटनेचे शहरप्रमुख कपिल अनुभवे आणि सहप्रमुख युगांत म्हात्रे यांनी शिबिराच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.

Exit mobile version