प्रतापगड पर्वाने जागविला इतिहास

अलिबागच्या ऐतिहासिक भूमीत शिवचरित्राचे सजीव सादरीकरण

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग येथे प्रतापगड पर्व कार्यक्रमातून शिवचरित्राचे सजीव सादरीकरण फाल्गुन वैद्य तृतीया, शके 1551 अर्थात 19 फेब्रुवारी 1630 हा स्वराज्याच्या उषःकालाचा दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिन. दख्खनवरील परकीय आक्रमणांची साखळी तोडून लोककल्याणकारी स्वराज्य उभारणारे शिवछत्रपती हे जिजाबाई यांच्या संस्कारांत घडलेले अद्वितीय व्यक्तिमत्त्व मानले जाते. या प्रेरणादायी वारशाचे स्मरण ठेवत अलिबागमध्ये भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अलिबाग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गाज फाउंडेशन आणि मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतापगड पर्व हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात शिवरायांच्या जीवनातील निवडक स्फूर्तीदायक प्रसंगांचे नाट्य-संगीताच्या माध्यमातून प्रभावी सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमास अलिबागकरांसह शिवप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, लोकाभिमुख राज्यकारभार आणि स्वराज्याची संकल्पना यांचे प्रभावी दर्शन घडविण्यात आले. आयोजकांनी उपस्थितांना शिवविचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक रघुजीराजे आंग्रे (गाज फाउंडेशन) आणि ॲड. मानसी संतोष म्हात्रे (मनस्विनी चॅरिटेबल ट्रस्ट) होते. मावळा प्रतिष्ठानचे आकाश राणे, यतिराज पाटील, सिद्धार्थ नाईक, शुभम नखाते व सहकाऱ्यांनी देखील सहकार्य केले.


कार्यक्रमास नगराध्यक्षा अक्षया नाईक, शेकाप राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, पोलीस निरीक्षक किशोर साळे, माजी नगराध्यक्ष तथा वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, नगरसेवक प्रदीप नाईक, संतोष गुरव, समीर ठाकूर, अनिल चोपडा, ॲड. श्वेता पालकर, ॲड. अंकित बंगेरा, जमाल सय्यद तसेच सर्व नगरसेवक उपस्थित होते. विरोधी पक्षनेते संदीप पालकर, जिल्हा परिषद सदस्या आदिती नाईक व प्रियदर्शनी पाटील, माजी सदस्य संजय पाटील आणि भारतीय जनता पक्ष जिल्हा सरचिटणीस ॲड. महेश मोहिते यांच्यासह विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली. शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत हेही उपस्थित होते.

2 / 6

कार्यक्रमाचे निवेदन अक्षय चंदेल यांनी केले. संगीत सादरीकरणात श्रेयश साळवी व शुभम गरुड (तबला), अनिरुद्ध सराफ (बासरी), हितेश क्षिरसागर (सिंथेसायझर), श्रवण दौंड (पखवाज), धीरज बडे (ढोलकी), गोविंद चौधरी (तालवाद्य), ऋग्वेद वंगारी (ढोल व डफ) यांचा सहभाग होता. कोरस गटात ओम घेबड, शुभम शिंदे, अभिजीत गुरव आणि प्रणव काकडे यांनी साथ दिली. नाट्य सादरीकरणात सुरज इंगवले यांनी शिवाजी महाराजांची भूमिका साकारली, तर ओमकार (बाजी) पांडव यांनी कवीभूषण, अनिल सावंत यांनी अफजल खान/नेतोजी, आणि ऋग्वेद पुंडकर यांनी गोपीनाथ पंत यांच्या भूमिका केल्या. पडद्यामागील कार्य अभिषेक कोळी यांनी सांभाळले. राजवारसा प्रोडक्शन निर्मित या कार्यक्रमासाठी गीतकार संतोष सातपुते यांचे विशेष योगदान होते. सूत्रसंचलन प्रतिम सुतार यांनी केले. प्रतापगड पर्व या कार्यक्रमातून शिवचरित्राचे जिवंत दर्शन घडल्याने उपस्थितांमध्ये राष्ट्राभिमानाची भावना जागृत झाली असून, शिवजयंती उत्सवाला एक वेगळे सांस्कृतिक स्वरूप लाभले. शुक्रवारी सायंकाळी अलिबागमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य अशा सोहळ्याचा आनंद अलिबागकरांनी घेतला.

प्रतापगड पर्व या कार्यक्रमातून अलिबागच्या ऐतिहासीक भूमीत सह्याद्रीचा आत्मविश्वास आणि सागराची विशालता याचा संगम साकारण्यात आला. युवा पिढीला शौर्य, संघटन, शिस्त आणि राष्ट्र प्रेम याची प्रेरणा या कार्यक्रमातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐतिहासिक विचार आणि मुल्यांचा संवाद साधण्यात आला. प्रतापगड पर्वच्या माध्यमातून महाराजांच्या कार्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे आणि अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रम पाहण्यासाठी अलिबागकारांसह शिवप्रेमींनी प्रचंड गर्दी केली होती.

Exit mobile version