615 बॅरिकेड्स व 16 ब्रेथ ॲनालायझर मशिन्सचे वाटप
सद्गुरूंच्या शिकवणीतून सेवा, शिस्त आणि सामाजिक एकतेचा संदेश
| रेवदंडा | प्रतिनिधी |
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्यावतीने रायगड पोलीस दलाला 615 बॅरिकेड्स आणि 16 ब्रेथ ॲनालायझर मशिन्सचे वितरण करण्यात आले. सद्गुरू डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या ‘देशासाठी योगदान देणे हीच खरी जबाबदारी’ या शिकवणीने प्रेरित या उपक्रमातून समाजसेवेचा आणि एकतेचा प्रभावी संदेश देण्यात आला. या उपक्रमांतर्गत प्रतिष्ठानचे प्रमुख डॉ. सचिन धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी आणि राहुल धर्माधिकारी यांच्या हस्ते जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांना सदर साहित्य सुपूर्द करण्यात आले.
या उपकरणांमुळे वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होणार असून अपघात रोखण्यासाठी मोठी मदत मिळणार आहे. विशेषतः ब्रेथ ॲनालायझर मशिन्समुळे मद्यधुंद वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल, तर बॅरिकेड्सच्या सहाय्याने रस्त्यांवरील अनियंत्रित वाहतूक रोखता येणार आहे.
यावेळी बोलताना डॉ. सचिन धर्माधिकारी यांनी सांगितले की, “सद्गुरूंनी दिलेल्या चांगल्या विचारांची अंमलबजावणी केली, तर समाजात प्रेम, आपुलकी आणि एकता वाढते. सेवा हीच खरी जबाबदारी मानून प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे.” त्यांनी पुढे निसर्गसुरक्षा आणि सामाजिक उपक्रम अधिक व्यापक करण्याचा मानसही व्यक्त केला.
उमेश धर्माधिकारी यांनीही ‘सेवा हीच खरी भक्ती’ हा संदेश अधोरेखित करत, या उपक्रमामुळे पोलिसांचे काम अधिक सुलभ होईल आणि नागरिकांमध्ये शिस्तीची जाणीव निर्माण होईल, असे नमूद केले.
जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी प्रतिष्ठानाचे आभार मानत सांगितले की, “ही मदत केवळ उपकरणांची नाही, तर सामाजिक जबाबदारीची जाणीव करून देणारी आहे. अशा उपक्रमांमुळे पोलीस दल अधिक सक्षम होईल.”
रायगड जिल्ह्यातील हा उपक्रम सामाजिक जागृतीसाठी महत्त्वाचा टप्पा ठरत असून, सेवा आणि एकतेच्या विचारातून समाज अधिक सशक्त होण्याचा संदेश यातून देण्यात आला आहे.






