| मुरुड | प्रतिनिधी |
मुरूडमधील नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी कुत्र्यांचा बंदोबस्त करा, या मागणीचे निवेदन मुरुड नगरपरिषदेला देण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे मुख्य शहरामध्ये सार्वजनिक रस्त्यावर विशेषतः भाजी मार्केट, मच्छी मार्केट व समुद्रकिनाऱ्यासह महत्त्वाच्या अनेक ठिकाणी उकुत्र्यांचा मुक्त संचार वाढलेला आहे. परिसरामध्ये मारुती नाका, मारुती मंदीर ते तहसिल कार्यालय या परिसरामध्ये देखील अशा उनाड कुत्र्यांचा मुक्त संचार वाढलेला आहे. नागरीकांना आपल्या दैनंदिन कामानिमित्त शहरात ये-जा करीत असताना या उनाड कुत्र्यांपासुन शारीरीक व आर्थिक नुकसान सहन करावे लागते. हे कुत्रे नागरीकांच्या अंगावर धावत जाऊन त्यांना चावून शारीरीक ईजा करतात. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या उनाड कुत्र्यांपासुन मुरूडकरांचे संरक्षण करावे, अशी मागणी जोर धरीत आहे.






