| तळा | प्रतिनिधी |
तळा तालुक्यातील रहाटाड, चरईखुर्द, भानंग, निगुडशेत, तळेगाव या ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी झालेली पोटनिवडणूक यंदा बिनविरोध पार पडली आहे. संबंधित जागेसाठी केवळ एकाच उमेदवाराने अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक प्रक्रिया न होता त्यांची थेट निवड जाहीर करण्यात आली. ही बिनविरोध निवड स्थानिक राजकारणात महत्त्वाची मानली जात असून गावातील प्रमुख राजकीय गटांमध्ये एकमत झाल्याचे यावरून स्पष्ट होते. काही दिवसांपासून गावात राजकीय हालचाली वाढल्या होत्या, मात्र शेवटी सर्व पक्षांनी आणि गटांनी एकत्र येत समन्वय साधला. तळेगाव ग्रामपंचायत पोटनिवडणूक एक महत्त्वाची राजकीय घडामोड समोर आली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गावात शिवसेनेच्या उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित जागेसाठी शिवसेनेने आपला उमेदवार वेळेवर उभा केला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर कोणत्याही पक्षाने किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध ठरली. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा सहज विजय झाला.







