11 हजार प्रकरणांचा निपटारा; तडजोडीतून साडेसोळा कोटींची वसूल
। अलिबाग । प्रतिनिधी ।
लोक अदालतीच्या माध्यमातून दाखलपुर्व आणि प्रलंबित खटले एकाच दिवशी निकाली लावण्याचा उपक्रम सर्वसमान्यांना फायदेशीर ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय यांच्या निदर्शनानुसार हा उपक्रम रायगड जिल्ह्यात हाती घेण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि.22) राष्ट्रीय लोक न्यायालयात 11 हजार 197 प्रकरणांचा निपटारा करण्यात आला आहे. तडजोडीतून 16 लाख 60 हजार 966 रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये वादपूर्व प्रकरणे 52 हजार 860 व प्रलंबित 10 हजार 155 अशी एकूण 63 हजार 15 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार 176 वादपूर्व प्रकरणे व 3 हजार 22 प्रलंबित प्रकरणे अशी एकूण 11 हजार 197 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली. त्याद्वारे पक्षकारांना एकूण 16 कोटी 60 लाख 14 हजार 966 रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली आहे.
जिल्ह्यातील अलिबागसह विविध न्यायालयांमध्ये 28 लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करुनसुद्धा प्रकरणे मिटविण्यात आली आहेत. लोक न्यायालयाला यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड पोलीस अधिक्षक, पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिला असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोल शिंदे यांनी यांनी दिली आहे.
संसार पुन्हा जुळले
लोक न्यायालयात अलिबाग, महाड व रोहामधील जोडप्यांची प्रकरणे होती. शनिवारी या जोडप्यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून घेतले. त्यांचा वाद सामंजस्याने मिटवून त्यांचा संसार पुन्हा जुळविण्यात यश आले. यामध्ये रोहा, महाडमधील प्रत्येकी एक व अलिबागमधील दोन अशा एकूण चार जोडप्यांचे मनोमिलन झाले. या जोडप्यांचा जिल्हा न्यायाधिश ए. एस. राजदेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
पावणे दोन कोटींची नुकसान भरपाई
रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी मोटार अपघात झाले आहेत. लोक न्यायालयामध्ये मोटार अपघात प्रकरणे घेण्यात आली. 35 मोटार अपघात प्रकरणांमध्ये तडजोड झाली असून पक्षकारांना 2 कोटी 70 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे.