यंदाही रस्ते पाणी साचून पाण्याखाली जाण्याची भीती
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण नगरपालिकेने लवकरच मान्सून पूर्व नाले सफाईला यावेळी प्राधान्य देऊन लवकरच सुरुवात केल्याने शहरातील मुख्य नाल्यांच्या सफाईचे काम हे मे अखेरपर्यंत 85 टक्के काम पूर्ण झाले आहे.
दरवर्षी उरण नगरपालिकेकडून पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम केले जाते. दरवर्षी शहरातील मान्सूनपूर्व नालेसफाईची कामे करण्यासाठी 16 लाख खर्चाची तरतूद केली जाते. शहरातील दादर, कुंभारवाडा, कामठा, भिवंडीवाला गार्डन, बोरीपाखाडी आदी मुख्य नाले आणि सात आठ छोटे नाले साफसफाई करण्याच्या कामाला दरवर्षी पावसाळ्यापूर्वीच सुरूवात केली जाते. यावर्षी ही नालेसफाईच्या कामांना मे महिन्यांपासून सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे नालेसफाईची कामे येत्या पावसाळ्यापूर्वीच पूर्ण होतील, अशी अपेक्षा शहरवासियांकडून व्यक्त केली जात आहे.
उनपचा मागील काही वर्षातील कामकाज पाहिला तर मान्सूनपूर्व नाले सफाईचा ठेका सत्ताधारी गटाचे नगरसेवक,पदाधिकारी यांच्या फेव्हरीट असलेल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनाच दिले जात असल्याची ओरड नेहमीच होत असते. या कामामुळे सत्ताधारी गटाच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांची आर्थिक सोय होत असली तरी नालेसफाईची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होतात. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस झालाच तर शहरातील नाले, गटारे तुंबतात. नाले, गटारे तुंबल्यामुळे जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील कामठा, पालवी हॉस्पिटल, राजपाल नाका, आनंद भुवन ते वैष्णवी हॉटेल, एनआय हायस्कूल ते हरी पांडव पथ, वैष्णवी हॉटेल ते कुंभारवाडा, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय ते कोर्ट या दरम्यानचे रस्ते नेहमीच पावसाचे पाणी साचून पाण्याखाली जातात. शहरातील वाहतूक व जनजीवन विस्कळित होते. यामुळे मात्र मान्सून पुर्व कामांची पोलखोल होते. मात्र, त्यानंतर नालेसफाईच्या कामाची नागरिक, विरोधकांनी बोंबाबोंब केली तरी सत्ताधारी आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष, कानाडोळाच करतात.
याबाबत सिडको व नागाव ग्रामपंचायतीकडे अनेकदा तक्रारीही केल्या आहेत. शहरातील नालेसफाईचे काम 85 टक्के काम पूर्ण झाले आहे. हे काम जूनअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे.
निखिल ढोरे,
उनपचे रचनाकार
