डॉ. किरण पाटील यांच्या आरोग्य यंत्रणेला सूचना
पेण | वार्ताहर |
स्तनदा आणि गर्भवती मातांच्या लसीकरणास प्राथमिकता देऊन ते प्राधान्याने करुन घ्यावे, अशा सूचना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.
पेण तालुक्यात दिवसेंदिवस होत चालेला कोरोनाचा उद्रेक लक्षात घेऊन ग्रामीण भागात तपासणी शिबिरांचे आयोजन आरोग्य यंत्रणेने सुरू केले आहे. याचाच आढावा घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्यधिकारी डॉ. किरण पाटील यांनी रोडे येथील तपासणी शिबिराला भेट दिली. त्यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना मी विशेष सूचना दिल्या आहेत की गावोगाव असणार्या स्तनदा माता व गर्भवती महिलांमध्ये जनजागृती करून युद्धपातळीवर त्यांचे लसीकरण करून घ्यायचे आहे. जेणे करून माता सुरक्षित असतील, तर कुटुंब सुरक्षित राहते. त्यामुळे स्तनदा माता व गर्भवती महिलांना लसीकरण करण्याचे सांगितले आहे.
आजच्या स्थितीत ग्रामीण भागात कोरोनाचा जो उद्रेक होत आहे, त्याला आटोक्यात आणण्यासाठी जास्तीत जास्त तपासणी शिबीर घेण गरजेच आहे. जेणे करून कोरोनाचा प्रसार रोखता येईल. रायगडमध्ये आपण असेच तपासणी शिबीर घेतल्याने एक निश्चित गोष्ट सांगू शकतो की निदान जेवढया लवकर झाले तेवढया लवकर उपचार मिळू शकले. त्यामुळेच ऑक्सिजन कमतरते पर्यत रुग्णांची स्थिती आली नाही. म्हणूनच जास्तीत जास्त शिबीरांचे आपण आयोजन करून तपासणी करत आहोत.
तसेच पुढे त्यांनी हे ही सांगितल की गावपातळीवर असलेल्या दक्षता समितीने योग्य ती जनजागृतीची जिम्मेंदारी घेउन गावामध्ये लसीकरणासाठी आणि तपासणीसाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित करायचा आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचार्यांना त्याचा फायदा होईल. रोडे येथील भेटीच्या दरम्यान मुख्याधिकार्यांच्या सोबत जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरिओम), कांदळे सरपंच मुरर्लीधर भोईर, मा. सरपंच रोडे स्वप्निल म्हात्रे, सरपंच संगिता सोनावणे, मा. उपसभापती सुनिल गायकर, गटविकास अधिकारी एम.एन.गढरी, तालुका आरोग्य अधिकारी अर्चना खेडेकर, वैद्यकीय अधिकारी मनिषा म्हात्रे, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या परवेक्षीका रश्मी झेमसे आदींसह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ व अधिकारी वर्ग हजर होते.
मुख्यालयात राहा, अन्यथा कारवाई
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या कर्मचार्यांनी मुख्यालय सोडू नये, अशी तंबी अधिकारी वर्गाना डॉ. किरण पाटील यांनी पेण येथील शिबिराच्या दरम्यान दिली. मुख्यालय सोडणार्या ग्रामसेवक, शिक्षक यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.