I म्हसळा I वार्ताहर I
म्हसळा तालुक्यातील घोणसे ग्रामपंचायतमध्ये शेतकरी कृषी अवजारे वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप स्थानिक रहिवाशी योगेश महागावकर यांनी केला आहे. या बाबतची माहिती माहितीच्या अधिकारात काढली असल्याची त्यांनी सांगितले.
या माहितीच्या अधिकारात 14 वा वित्त आयोगाच्या सन 2019/20 च्या खर्चाच्या अहवालानुसार, शेतकरी कृषी अवजारे ही एस जी एम एंटरप्राइज यांचकडून खरेदी केली आहे. त्याची एकूण रक्कम बँक ऑफ इंडियाच्या म्हसळा शाखेतून 49998/- अदा केली, अशी माहिती आहे. सदरच्या बँक व्यवहारात तफावत असल्याचा आरोप महागावकर यांनी केला आहे.
एकूण 293 अवजारे त्यामध्ये 48 टिकाव, 48 घमेले, 48 फावडी, 48 विले, 48 कोयते, 53 दांडे एवढि आहेत.परंतु सदर अवजारे फक्त आठ ते नऊ जणांचा वाटप केले असल्याचे महागावकर यांनी सांगितले. बाकीचे अवजारे गेले कुठे, आणी या बाबतीत काही गैरव्यवहार झाला असेल तर त्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली असल्याची सुद्धा सांगीतले.
मागील काही महिन्यात सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या घोणसे ग्रामपंचायतच्या सरपंच या राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्ष आहेत. त्यांना या घोटाळ्याबाबत विचारले असता हे सगळे आरोप खोटे असून घोणसे ग्रामपंचायत मोठी असल्याने आलेल्या कृषी अवजारे यांचा वाटप योग्य रीतीने सगळ्यांना विश्वासात घेऊन केला असल्याचे सांगितले.