गॅस दरवाढीमुळे मातीच्या चुलींची पसंती

। खांब-रोहा । वार्ताहर ।
दिवसेंदिवस स्वयंपाकाच्या गॅसचे दर वाढत चालले असल्याने गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडू लागल्याने खेड्यापाड्यातील महिलांनी पुन्हा एकदा मातीच्या चुलीला पसंती दिली असल्याचे एकंदरीत परिस्थितीवरून दिसून येत आहे. सर्वच बाबतीत वाढणारी महागाई थांबण्याचे नावच घ्यायला तयार नाही. त्यात पेट्रोलजन्य पदार्थांच्या किंमती तर दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. गॅसचे दरही वाढू लागल्याने स्वयंपाकासाठी दर महिन्याचा गॅस भरणे आता गृहिणींच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याने पूर्वापार स्वयंपाकघरात मानाचे स्थान असणार्‍या मातीच्या चुलींना आता गृहिणींनी पहिली पसंती दिली आहे.

सध्याच्या आधुनिकतेच्या युगात मातीच्या वस्तू कालबाह्य होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कुंभार समाजाच्या पिढीजात व्यवसायावर एक प्रकारे संकटच कोसळले आहे. फक्त मातीचे मडके तेवढे बनविण्याचे काम कुंभार समाज व्यावसायिकांना शिल्लक राहिले असतानाच पुन्हा एकदा गॅसच्या दरवाढीमुळे मातीच्या चुलींना मागणी वाढल्याने कुंभार व्यावसायिकांना काम तर मिळाले आहेच. याशिवाय आर्थिक अडचणही दूर होऊ लागली आहे.

Exit mobile version