दुर्दैवी घटना! गर्भवती महिलेचा बाळासह मृत्यू

वेळीच योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची चर्चा; आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

। मंडणगड । प्रतिनिधी ।

मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक या गावातील एका गर्भवती महिलेचा आपल्या बाळासह मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (दि. 10) घडली. तालुक्यातील आरोग्य विभागाच्या उदासीन कारभाराचा फटका या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याची जोरदार चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. यासंदर्भात तालुक्यात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत असून या घटनेबाबत चौकशीची मागणीही जोर धरत आहे.

याबाबत महिलेच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंडणगड तालुक्यातील कुडूक बुद्रुक या गावातील विधी संदेश सावणेकर (32) या सात ते आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने कुटुंबातील लोकांनी त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे येथे उपचारासाठी आणले. देव्हारे प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेद्वारे मंडणगड येथील ग्रामीण रुग्णालय येथे पाठवले. ग्रामीण रुग्णालयात या महिलेची प्रकृती आणखीच गंभीर झाली. त्यानंतर येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अधिक उपचाराकरिता दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. मात्र, यावेळी पुढील उपचारासाठी नेण्यासाठी आवश्यक असणारी रुग्णालयाची रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. 108 वर फोन केला असता ही रुग्णवाहिका कॉलसाठी अन्य ठिकाणी गेल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर 102 ही रुग्णवाहिका रुग्णालयात असतानाही विविध कारणे सांगून सेवेसाठी उपलब्ध करण्यात आली नाही. नाईलाजाने या महिलेच्या कुटुंबीयांनी खाजगी रुग्णवाहिकेचा आधार घेऊन दापोली गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र, रुग्णवाहिकेच्या गोंधळाच्या दरम्यान अधिकसा वेळ गेल्याने या महिलेचा रस्त्यातच प्रवासादरम्यान बाळासह मृत्यू झाला.

मंडणगडमधील भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्र, देव्हारे याठिकाणी या गरोदर महिलेवरील उपचार पद्धतीदरम्यान असलेल्या आरोग्य सेवेबाबत तालुकावासियांमधून प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णवाहिका उपलब्ध असूनही विविध कारणे सांगून रुग्णवाहिका उपलब्ध नसणे, ऑक्सिजनची उपलब्धता नसणे, चालक नसणे, डिझेल नसणे अशी अनेक कारणे रूग्णवाहीकेच्या संदर्भात आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गर्भवती महिलांसाठी विविध योजनांच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा उपलब्ध करण्यात आलेल्या असताना मंडणगड तालुक्यामध्ये या सेवेची अंमलबजावणी का होत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

कुटुंबियांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे दाखल झालेले असताना आवश्यक असणारे उपचार त्या ठिकाणी देण्यामध्ये हे व्यवस्थापन कमी पडल्याचे पुढे येत आहे. या संदर्भामध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी अभिषेक गावंडे यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन या संदर्भात अधिक माहिती देतो असे उत्तर देण्यात आले. त्याचबरोबर दि. 12 मे रोजी या संदर्भामध्ये अधिक माहिती घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र देव्हारे याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हाके यांना संपर्क केला असता त्यांचा दूरध्वनी बंद येत आहे. या घटनेच्या चौकशीची मागणी या महिलेच्या कुटुंबाकडून व तालुक्यातील नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.

Exit mobile version