परिवहन मंत्र्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश
। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील टी-1 व टी-2 टर्मिनल येथे 1 जूनपासून प्रीपेड ऑटोरिक्षा सुरू होणार आहे. त्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत परिवहन विभाग आणि अदानी समूहाला निर्देश दिले आहेत.
सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या पार्श्वभूमीवर विधानभवनात परिवहन विभाग आणि अदानी समूहाच्या प्रतिनिधींची सोमवारी (दि.17) बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रीपेड ऑटो रिक्षाबाबत निर्देश दिले. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व व्यवस्थापन अदानी समूहाकडे आहे. त्यामुळे अदानी समूह आणि परिवहन विभागाच्या समन्वयातून पुढील दोन महिन्यांत प्रीप्रेड रिक्षा सेवा सुरू करण्यासाठी सर्व आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही केली जाणार आहे. विमानतळावर प्रीपेड ऑटोरिक्षाची सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे.