स.रा.तेंडूळकर विद्यालयाने घेतला पुढाकार
। रेवदंडा । प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील कोएसोच्या स.रा. तेंडूळकर विद्यालयाच्या नजीकच्या मैदानात गोवा मुक्ती संग्रामात झोकून देत प्राणार्पण केलेले शेषनाथ वाडेकर यांचे हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे. मात्र, या स्मारकाच्या उभारणीनंतर शासन पुर्णतः उदासिनता दाखवित असल्याने स्मारक तसेच परिसर पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेण्यास अपयशी ठरले आहे. दरम्यान, येथील कोएसोच्या स.रा. तेंडूळकर विद्यालयाकडून या परिसरात स्वच्छते सोबतच सुंदर बगीचा व वृक्षारोपण करण्यात आले आहे.
शेषनाथ नानाभाई पितळे उर्फ वाडेकर यांचा जन्म 1918 साली मुंबई येथे झाला असून 1932 साली रेवदंडा येथे वास्तव्यास आले. वाडेकर हे तत्कालीन राष्ट्रवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. दरम्यान, अन्नधान्य टंचाईच्या काळात व्यापाराचे धान्य बाहेर जाऊ देऊ नये यासाठी लढा देत असतानाच् त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी त्यांना काही काळ अलिबाग व पुण्यातीली येरवडा येथे कारावास भोगावा लागला होता. त्यानंतर 1955 मध्ये गोवा मुक्ती संग्राम सुरू झाला. नानासाहेब पुरोहित व हिरवे गुरूजी यांनी पाठविलेल्या पत्रामुळेचे वाडेकर यांनी गोवा मुक्ती संग्रामात सहभागी होत स्वातंत्राच्या लढ्यात स्वतःला झोकून दिले होते. गोवा मुक्ती संग्रामात तेरेखोल किल्ल्यावर तिरंगा झेंडा फडकविताना पोतृगिजांनी केलेल्या गोळीबारात छातीवर गोळी घेत ते मृत्यूमूखी पडले होते. त्यामुळे त्यांचे हुतात्मा स्मारक बॅ.ए.आर. अतुंले यांनी त्यांच्या मुख्यंमत्री कालखंडात (1982-83) रेवदंडा येथे उभारले होते.
रेवदंडा हायस्कुलच्या बाजूच्या जागेत उभारलेले वाडेकर यांच्या हुतात्मा स्मारकाची शासनाने काही वर्षे देखभाल केली. परंतु, त्या स्मारकाच्या सभोवताली असलेल्या खाजण परिसरात मातीचा भराव नसल्याने आजूबाजूचा परिसर झाडे झूडपे आणि सांडपाण्यानेच गजबजून गेला आहे. तसेच, मोठ्या प्रमाणावर घाणीचे साम्राज्य देखील पसरले आहे. त्यामुळे या हुतात्मा स्मारकाची अवहेलना तेव्हापासूनच होत असल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. शिवाय परिसराला संरक्षीत भिंत नसल्याने आणखीनच दुरवस्था झाली आहे. त्यामुळे मोकाट गुरांचा येथे निर्धास्तपणे वावर सुरू असतो. त्यातच शासनाच्या दुर्लक्षामुळे स्मारक परिसरातील विजेचे दिवे, लाईट व्यवस्था देखील मोडकलीस आली आहे. त्यामुळे येथे अनैतिक धंदे देखील तेजीत सुरू असल्याचे बोलले जात आहे. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन व क्रांतीदिनाच्या दिवशी येथे को.ए.सो. विद्यालय रेवदंडा, शासकीय अधिकारी, पोलीस खाते, ग्रामपंचायत सरपंच व सदस्य ध्वजारोहण करत असतात. मात्र, शासनाच्या दुर्लक्षतेने पर्यटकांचे लक्ष्य वेधून घेण्यास स्मारक व परिसर अयशस्वी ठरले आहे. शासनाने दखल घेऊन हे स्मारक पर्यटन स्थळ बनवावे, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
हुतात्मा स्मारकाच्या जतनाचा प्रयत्न
शेषनाथ वाडेकर या क्रांतीविराच्या हुतात्मा स्मारकाची होणारी दुरवस्था पाहून त्याचे जतन करण्यासाठी रेवदंड्याच्या कोएसो स.रा. तेंडुळकर विद्यालयाने पुढाकार घेतला आहे. स्मारकाच्या परिसरात मातीचा भराव असलेल्या सभोवताली वृक्षारोपण करण्यात आले आहे. तसेच, स्मारकाची स्वच्छता करून त्याच्या सुशोभिकरणाकडे लक्ष देऊन त्यांची निगा राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच, स्मारकाच्या परिसराचा दुरूपयोग किंवा याठिकाणी कोणतेही गैरधंदे केले जाऊ नयेत, त्यासाठी रेवदंडा विद्यालयातर्फे याठिकाणी रात्रंदिवस शिपाईची नेमणूक करण्यात आली आहे.