| तळा | वार्ताहर |
तळा तालुक्यात गणेशोत्सवानंतर सर्वत्र नवरात्रोत्सवासाठी मंडळांकडून लगबग सुरू झाली आहे. अवघ्या आठवड्यावर नवरात्र उत्सव येऊन ठेपला असल्याने नवरात्र उत्सव मंडळ तयारीला लागले आहेत.
नवरात्र म्हटले की तरुण तरुणी या दिवसांची आतुरतेने वाट पाहात असतात. यामध्ये देवीच्या आराधनेसोबतच नृत्यकलाही मोठ्या प्रमाणात सादर होत असतात. तरुणाई नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे परिधान करतात. देवीची पूजा आरती करून रात्री गरबा रासचा आनंद लुटला जातो. नवरात्र उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने तालुक्यातील सार्वजनिक मंडळांनी आपल्या आवडीची मूर्ती बुकिंग करण्यास सुरुवात केली आहे. उत्सवासाठी लागणारे मंडप, साऊंड सिस्टीम, हार, वेणी, फुले यांसह नऊ दिवस घेण्यात येणार्या विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात देवीभक्त मग्न झाले आहेत. मूर्तींच्या कारखान्यात रंगकाम करणारे कारागीर देवीच्या मूर्तीवर शेवटचा हात फिरविण्यात व्यस्त आहेत. यंदा डिझाईन व हिरेजडित देवी मूर्तींना पसंती असल्याने मंडळाच्या मागणीप्रमाणे देवीची मूर्ती सजविण्यात येत आहे. एकंदरीत, नवरात्रोत्सवाची लगबग सुरु झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.